भाईंदर : मीरा -भाईंदर महानगरपालिकेने महापालिका शाळेतील १५ शिक्षकांना पदोन्नती दिली असून त्यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती केली आहे. त्यात मराठी माध्यमातील ९ तर हिंदी माध्यमातील ६ शिक्षकांचा समावेश आहे. सेवाज्येष्ठतेनुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. मीरा- भाईंदर महानगरपालिकेची २००२ रोजी स्थापना झाली. जिल्हा परिषदेकडून मीरा-भाईंदर नगरपालिकेकडे विविध माध्यमांच्या २८ शाळा इमारती आणि २०२ शिक्षकांसह हस्तांतरण झाल्या होत्या. २८ शाळेची संख्या वाढून ३६ झाली आहे. सध्या महापालिकेकडे मराठी माध्यमांच्या २१, हिंदी माध्यमांच्या ४ तर उर्दू आणि गुजराती माध्यमांच्या एकूण ५ शाळा आहेत. या शाळांध्ये ९ हजार ५३५ विद्यार्थी शिक्षण आहेत. महानगरपालिकेतील शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सामान्य कुटुंबातील आहे. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. महापालिका विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या कला गुणांना, बौद्धिक क्षमतेला वाव देणारे विविध उपक्रम शाळांमध्ये राबवले जात असते. यासाठी पायाभूत सुविधा देण्याबरोबर शिक्षकांच्या रिक्त जागा भरून नवीन शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना पदोन्नती देण्याचे धोरण महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी संमत केले आहे, त्यानुसार शिक्षकांना पदोन्नती देण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ९ तर हिंदी माध्यम शाळांमध्ये ६ शिक्षिकांची मुख्याध्यापकपदी पदोन्नती झाली असून, त्यापैकी शिक्षकांमध्ये ममता पिंपळे, जॅकलीन लोपीस, नंदा गायकवाड, नंदा खरात, नेहा साळवी, मंदा शिंदे, मंदाकिनी लामखडे, वैष्णवी देवरुखकर, नेहा साळवी आदी मराठी माध्यमांच्या शिक्षिकांचा तर कैलासनाथ माळी, सुनिता अरोरा, लुइझा डाबरे, पारसनाथ माळी आदी हिंदी माध्यमांतील शिक्षकांचा समावेश आहे. पदोन्नतीमुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, या शिक्षकांनी मनपा आयुक्त काटकर यांची आयुक्तालयात भेट घेऊन आभार व्यक्त केले.