थकित विद्युत ग्राहकांवर लवकरच दंडात्मक कारवाई

शहरातील घरगुती विद्युत वापर करणार्‍या 950 ग्राहकांनी अजुनही थकित रक्कम भरणा केलेली नाही. जवळपास ही थकित रक्कम 75 लाखांहून अधिक आहे.

वाडा:  शेजार्‍याला वीज दिली म्हणून अलिकडेच भरारी पथकांनी वाडा शहरातील 33 वीज ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढील कारवाई येथील 950 थकित विद्युत ग्राहकांवर लवकरच केली जाणार आहे. 75 लाख रुपयांची ही थकबाकी 31 मार्च 2023 पुर्वीची असल्याचे विद्युत वितरण कंपनीकडून सांगण्यात आले. 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी असलेल्या ग्राहकांना वारंवार आवाहन करुनही वाडा शहरातील घरगुती विद्युत वापर करणार्‍या 950 ग्राहकांनी अजुनही थकित रक्कम भरणा केलेली नाही. जवळपास ही थकित रक्कम 75 लाखांहून अधिक आहे.

थकीत रक्कम असलेल्या अनेक विद्युत ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. काही ग्राहकांचे विद्युत मीटर काढण्यात आले आहेत. विद्युत मीटर काढण्यात आलेल्या काही ग्राहकांना शेजारी राहणार्‍या विद्युत ग्राहकांनी विद्युत पुरवठा दिला आहे. या शेजारील विद्युत ग्राहकांवर विद्युत वितरण कंपनीने कारवाई केली आहे.
शेजारच्या घरात विद्युत पुरवठा देणे हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहिती असतानाही काही ग्राहकांकडून हा गुन्हा केला जात आहे. मागील महिन्यात भरारी पथकांनी वाडा शहरात टाकलेल्या धाडीत अशा 33 ग्राहकांवर न्यायालयीन नोटीसा पाठवून दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत 4 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकीकडे विद्युत वितरण कंपनीकडून कारवाई होत असताना दुसरीकडे येथील नेहमीच खंडित होणारा विद्युत पुरवठा, वेळेवर विद्युत देयके न मिळणे, अनामत रकमेत वाढ करणे या विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रामाणिक ग्राहकांकडून ओरड केली जात आहे.

 

वेळच्यावेळी विद्युत देयके भरण्यासाठी सर्वांनीच सहकार्याची भूमिका ठेवली तर कारवाई करण्याची वेळच येणार नाही.

-राधेश्याम कुमावत – सहाय्यक अभियंता, विज वितरण कंपनी, वाडा शहर.