दहिसर ते भाईंदर मेट्रो मार्गिकेसाठीच्या कारशेडला राई गावकर्‍यांचा विरोध

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दहिसर ते भाईंदर पश्चिम मेट्रो मार्गिका क्रं. ९ या प्रकल्पाकरता भाईंदर पश्चिमेला कारशेड उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

कारशेड (प्रातिनिधिक फोटो)

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दहिसर ते भाईंदर पश्चिम मेट्रो मार्गिका क्रं. ९ या प्रकल्पाकरता भाईंदर पश्चिमेला कारशेड उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र ग्रामस्थांनी कारशेडची जागा हस्तांतरित करण्यासह मेट्रो मार्गीकेसाठी रस्ता रुंदीकरण करण्यास विरोध दर्शवला आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात मिरा-भाईंदरमध्ये मेट्रो कारशेड वरून वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेट्रोला जोडणारे मुर्धा व राईगाव हे असणार आहेत. दहिसर ते भाईंदर मेट्रो ९ चे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पूर्वी भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदान हे अंतिम मेट्रो स्थानक निश्चित करण्यात आले होते. मात्र कारशेड उभारण्याच्या दृष्टीने त्याचा विस्तार राई गावापर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रो कारशेडसाठी राई गावातील ४८७ लोकांची जमीन असून त्यात ३२ हेक्टर जमीन आरक्षित करण्यात आली असून ती हस्तांतरित केली जाणार आहे.

रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे अनेक ग्रामस्थांची घरे बाधित होणार असल्याने पूर्वी देखील त्याला विरोध करण्यात आला होता. सुभाष चंद्र बोस मैदानाच्या मागील बाजूने मेट्रो कारशेडकडे जाण्यासाठी मार्ग तयार करावा. मेट्रो कारशेडसाठी स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्याला विरोध आहे.
– अशोक पाटील, अध्यक्ष, भूमिपुत्र सामाजिक समन्वरय संस्था

पूर्वी मेट्रो कारशेडकडे जाण्याचा मार्ग नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानाच्या मागील बाजूने मिठागराच्या जमिनीतून एमएमआरडीएकडून तयार केला जाणार होता. परंतु ही जागा हस्तांतर करण्याचे धोरण नसल्यामुळे, केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन काम सुरु करण्यात विलंब होण्याची शक्यता आहे. म्हणून सुभाष चंद्र बोस मैदानात समोरून राई गाव ते मेट्रो कारशेड, असा मार्ग तयार करण्याचा विचार एमएमआरडीएचा आहे. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असले तरी ग्रामस्थांनी ते बंद पाडले आहे.

राई गावापर्यंत मेट्रो मार्गिका व कारशेड तयार करण्यासाठी कमीत कमी जागा बाधित करण्याचा प्रयत्न असणार आहे. ग्रामस्थांनी सर्वेक्षणाच्या कामाला विरोध केला आहे. परंतु त्यांना विश्वासात घेऊन लवकरच तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित केली जाणार आहे.
– योजना पाटील, कार्यकारी अभियंता, मेट्रो लाईन ९

राई गाव मार्गावरून मेट्रो गेल्यास सध्या अस्तित्वात असलेला ७ मीटर रस्ता अरुंद असल्याने तो रुंद करावा करावा लागणार आहे. यात अनेक ग्रामस्थांची घरे बाधित होणार आहेत. तसेच मेट्रो कारशेडमुळे शेतजमिनी संपुष्टात येणार असल्याने ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. महापालिका आयुक्त दिलीप ढोले, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबीत, सुरेश वाकोडे, एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, उपअभियंता सचिन कोठावळे, भूसंपादन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत भूमिपुत्र समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यावेळी कारशेडला विरोध करण्यात आला.

हेही वाचा –

Mumbai Coronavirus : इतर राज्यांप्रमाणे मुंबईत घाईत निर्णय घेणार नाही; महापौर पेडणेकरांचा सावध पवित्रा