घर पालघर डहाणूपर्यंत नव्या लोकल फेर्‍या वाढवण्यास रेल्वेचा रेड सिग्नल

डहाणूपर्यंत नव्या लोकल फेर्‍या वाढवण्यास रेल्वेचा रेड सिग्नल

Subscribe

त्यामुळे सर्विस मार्ग उपलब्ध नसल्याचे कारण देऊन लोकल फेर्‍या वाढवण्यास विरोध करणार्‍या अधिकार्‍यांवर काळे यांनी बैठकीतच नाराजी व्यक्त केली.

वसईः डहाणूपर्यंत नव्या लोकल फेर्‍या वाढवण्यास रेल्वेने नकार दिला आहे. सर्विस रेल्वे मार्ग नसल्याचे कारण देत रेल्वे प्रशासनाने विरार ते डहाणू दरम्यानच्या लाखो रेल्वे प्रवाशांची निराशा केली आहे. बैठकीत उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या जवळपास सर्वच मागण्या रेल्वे प्रशासनाने अमान्य केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १ सप्टेंबर २०२३ ला मंडळ रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत समितीचे सदस्य केदार काळे यांनी डहाणूपर्यंत लोकलच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी केली होती. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने फेर्‍या वाढवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. सर्विस मार्ग उपलब्ध नसल्याने नवीन लोकल देता येत नाहीत, असे कारण त्यांनी पुढे केले. तेव्हा काळे यांनी एक्सप्रेस गाड्यांच्या वाढलेल्या फेर्‍यांकडे अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. बांद्रा-गोरखपूर एक्सप्रेसच्या आठ फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. काही हॉलिडे स्पेशल आणि राजस्थानकडे जाणार्‍या गाड्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्विस मार्ग उपलब्ध नसल्याचे कारण देऊन लोकल फेर्‍या वाढवण्यास विरोध करणार्‍या अधिकार्‍यांवर काळे यांनी बैठकीतच नाराजी व्यक्त केली.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांना मार्ग मोकळा करण्यासाठी लोकल गाड्या केळवे रोड, पालघर, बोईसर येथे सायडिंगला लावून उभ्या केल्या जातात. त्यामुळे डहाणू-विरार दरम्यानच्या लोकल गाड्या नेहमीच उशिराने धावत असतात. त्यामुळे हजारो कामगारांना लेट मार्क मिळून त्यांची गैरसोय होत असल्याकडेही या बैठकीत काळे यांनी लक्ष वेधले. डहाणूपर्यंत उपनगरीय रेल्वे असल्याने मेल आणि एक्सप्रेसऐवजी लोकल गाड्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावरही रेल्वे अधिकार्‍यांनी ही बाब वरिष्ठांना कळवण्यात आली असल्याचे सांगत विषयाला बगल दिली. तेव्हा हा प्रश्न गेले वर्षभर प्रत्येक बैठकीत मांडूनही अशीच उत्तरे दिली जात असल्याबद्दल काळे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.बलसाड फास्ट पॅसेंजर आणि मेमो गाड्यांना एक्सप्रेसचे तिकीट घेतले जाते. त्यामुळे डहाणू-विरार दरम्यानच्या लाखो प्रवाशांना आर्थिक भूर्दंड बसत असल्याची तक्रार केली असता ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातल्याचे सांगत रेल्वे अधिकार्‍यांनी त्यावर कोणताहा निर्णय दिला नाही. डहाणूवरून विरारकडे जाणारी सकाळी सात वाजताची लोकल पुन्हा सुरु करावी ही मागणीही रेल्वे प्रशसानाने अमान्य केली आहे.

- Advertisement -

डहाणू रेल्वे स्टेशनवरून सकाळी सात वाजता डहाणू- विरार लोकल सुरू करावी ही मागणी ही अमान्य करण्यात आली. सफाळा पश्चिमेला दोन शिफ्टमध्ये बुकिंग विंडो सुरू असल्याचे सांगण्यात आले. पुणे-बिकानेर एक्सप्रेसला पालघरचा थांबा देण्याची मागणीही नाकारण्यात आली. फ्लाईंग राणीचे कोच पूर्वीप्रमाणे डबल डेकर करावेत. नवीन कोचमुळे दैनंदिन रेल्वे प्रवाशांच्या जागा कमी झाल्याचे काळे यांनी रेल्वे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.

 

- Advertisement -

स्वच्छतागृह अस्वच्छ असेल तर ठेकेदारावर कारवाई

प्रत्येक रेल्वे स्टेशनची स्वच्छतागृह स्वच्छ रहावीत असा आग्रह केदार काळे यांनी धरला असता मेंटेनन्ससाठी खाजगी कंत्राटदाराकडे कॉन्ट्रॅक्ट दिल्याचे उत्तर मिळाले. जर अस्वच्छ असेल तर आपण कंप्लेंट बुकमध्ये कंप्लेंट नोंदवावी किंवा अ‍ॅपवर तक्रार करावी. आम्ही पॅनल्टी मारू, असे आश्वासन मात्र अधिकार्‍यांनी दिले.

- Advertisment -