घरपालघरपालघर जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर

पालघर जिल्ह्यात पावसाचा पुन्हा कहर

Subscribe

मंगळवारी पहाटेपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. वसई विरार, पालघर, बोईसर, डहाणू शहरामध्ये पाणी साचून राहिले होते.

मंगळवारी पहाटेपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. वसई विरार, पालघर, बोईसर, डहाणू शहरामध्ये पाणी साचून राहिले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. गेले अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी पहाटे पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे विरार, नालासोपारा, नवघर-माणिकपूर शहरात सखल भागात पाणी साचून राहिले होते. विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसरात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. नालासोपार्‍यातही अनेक भागात पाणी साचले होते. नालासोपारा पश्चिमेकडील नाळे येथे वसई-अर्नाळा मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिल्यने वाहतूक ठप्प झाली होती.

डहाणू परिसरात पावसाने हैदोस माजवला आहे. डहाणू,चिखले,घोलवड,बोर्डी परिसरातील अनेक रस्ते व सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. डहाणू शहरातील अनेक घरे व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. डहाणू तालुक्यात तब्बल २२३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. डहाणू तालुक्यातील पूर्व भागात पावसाची तीव्रता कमी होती. तर पश्चिम किनारपट्टीला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक छोटे पूल रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतुकीलाही अडचणी निर्माण झाल्या होत्या. डहाणू शहरातील इराणी रोड, चंद्रिका हॉटेल परिसरात बर्‍याच प्रमाणात पाणी साचले होते. पालघर शहरासह मनोर,केळवे,सातपाटी,सफाळे,बोईसर,शिरगाव आदी गावांमध्येही पाणी साचून राहिले होते.

- Advertisement -

शंभर घरांमध्ये शिरले पाणी

रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने घोलवड परिसरातील बोर्डी, घोलवड, चिखले येथील वस्त्या, पाड्यातील शंभरहून अधिक घरांमध्ये पाणी भरले होते. पोलीस निरीक्षक रविंद्र पारके यांना ही माहिती मिळताच आपल्या पथकासह त्यांनी मदतकार्य हाती घेतले होते. बोर्डी येथील धुंडीयापाडा, बाभुळपाडा, मरवड येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या शंभरहून अधिक लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. यात ४५ वृद्ध इसम आणि लहान मुलांचा समावेश होता. स्थलांतरीत लोकांना पोलिसांनी जेवण, बिस्कीट, पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.

तीन जणांचे प्राण वाचवले

मुसळधार पावसामुळे झाई खाडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये तीन युवक पुराच्या पाण्यात वाहून जात होते. घोलवड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून तीनही जणांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. यातील एकाची प्रकृत्ती चिंताजनक झाल्याने त्याला उमरगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. ३० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात ८६.५ मिमी,जव्हार तालुक्यात १२ मिमी,विक्रमगड तालुक्यात १० मिमी,मोखाडा तालुक्यात १५.४० मिमी,वाडा तालुक्यात ६७.०० मिमी,डहाणू तालुक्यात ८८.९२ मिमी,पालघर तालुक्यात १०.५० मिमी,तर तलासरी तालुक्यात ३८.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पालघर जिल्ह्यात सरासरी ५३.६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा पश्चिम आणि मध्य भारतातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात तीन ते चार दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु राज्यात पावसाच्या वातावरणाची निर्मिती झाल्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा –

भारत आणि तालिबान मध्ये औपचारिक चर्चा सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -