विरार : वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वसई-विरार महापालिका क्षेत्रात चार नवीन रेल्वे उड्डाणपुलांची गरज नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केली. राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार राजन नाईक यांनी वसई-विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या अधोरेखित केली. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित चार रेल्वे उड्डाणपुलांचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
वसई-विरार महानगर पालिकेची स्थापन 2009 साली झाली. चार नगर परिषदा आणि परिसरातील 53 गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला. सन 2011 च्या जनगणनेनुसार शहरात सुमारे 12 लाख 23 हजार लोकसंख्या आहे. सध्या ही लोकसंख्या अंदाजित 30 लाख इतकी आहे. वसई-विरार शहराच्या नागरीकरणाची गती पाहता भविष्यात या लोकसंख्येत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या वाढीनुसार शहरात सार्वजनिक वाहतुकीसोबतच खासगी वाहतूक आणि माल वाहतूकदेखील वाढलेली आहे. साहजिकच; सध्या असलेल्या रेल्वे उड्डाणपुलांवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विरार-विराट नगर, नालासोपारा येथील ओसवाल नगरी, अलकापुरी आणि वसई येथील उमेळमान येथे पूर्व-पश्चिम जोडणारा रेल्वे उड्डाणपूल अशा प्रमुख चार नवीन उड्डाणपुलांचा यात समावेश आहे. या रेल्वे उड्डाणपुलांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने येथील नागरिकांत सरकारविषयी प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे राज्य सरकारने या चारही रेल्वे उड्डाणपुलांचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तातडीने मार्गी लावावे, अशी आग्रही मागणी आमदार राजन नाईक यांनी या वेळी केली आहे.