मोखाडा : तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून धान्य वाटपाच्या मशीनमध्ये तांत्रिक अडचणींमुळे ते मशीन बंद पडत आहे.यामुळे येथील गोरगरीब जनतेची गैरसोय होत आहे आणि लाभार्थ्यांना रेशन मिळण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागते आहे.
डिसेंबर महिन्याचे जवळ जवळ १७ ते 18दिवस लोटले असतानाही मशीन बंदच्या अभावाने रेशन दुकानात धान्य पुरवठा ठप्प झाल्याचे दिसते आहे.तासनतास रांगेत उभे राहूनही रेशन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्रतेची लाट उसळताना दिसत असून शासन नागरिकांची गैरसोय थांबवेल का? असा संतप्त सवाल मात्र या निमित्ताने विचारला जात आहे.नागरिकांच्या रोषाला रेशन दुकानदाराना सामोरे जावे लागते आहे. सर्व लाभार्थ्यांना मशीन बंद झाल्याचे सांगून लोकांचे मतपरिवर्तन करताना रेशन दुकानदार दिसत आहेत. एकीकडे शासनाने २०२९ पर्यंत मोफत रेशन वाटपाची घोषणा केल्यानंतर विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन सरकार स्थापन होऊनही जर गोरगरीब जनतेला आपल्या हक्काचे धान्य मिळत नसेल तर त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण केला जात आहे.
ई-पॉस मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे तालुका स्तरावर रेशन वाटपात व्यत्यय येत आहे.वरिष्ठांना माहिती दिली असता केंद्र स्तरावरून अडथळा येत आहे, असे सांगण्यात येत आहे.
– नामदेव लहामगे, स्वस्त धान्य पुरवठा अध्यक्ष, मोखाडा तालुका