वसई : शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेमधील नावांची दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे आदी कामे ऑनलाइन स्वरूपात केली जातात मात्र मागील आठ दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ बंदच असल्यामुळे शिधापत्रिका धारकांची ऑनलाइन स्वरूपात होणारी कामे रखडली आहेत. यामुळे नागरिकांसह कर्मचार्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
शिधापत्रिका काढण्यासाठी नागरिकांची होणारी परवड थांबविण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मात्र मागील आठ दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ( आरसीएमएस) चे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे वसईत शिधापत्रिकेच्या संबंधित एक हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. वसई विरार मध्ये नवीन शिधापत्रिका काढणे, नावे चढविणे, कमी करणे, विभक्त करणे अशा विविध कामासाठी नागरिकांना सेतू कार्यालयात येत असतात. काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांना मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची शिधापत्रिका मिळविण्यासाठी फरफट करावी लागते.
तर काही वेळा दलालाकडून ही नागरिकांची आर्थिक लूट होत होती. असे प्रकार थांबविण्यासाठी यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ( आरसीएमएस) विकसित करण्यात आली आहे. नागरिक सातत्याने शिधापत्रिकेच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी येतात त्यांना ही काम न होताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. संकेतस्थळ बंद असल्याने वसई तालुक्यात शिधापत्रिकेच्या संदर्भात एक हजाराहून अधिक प्रकरणे प्रलंबित राहिली असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
ऑफलाईन होते चांगले होते. शिधापत्रिकांची कामे ऑनलाइन केली आहेत. मात्र त्याचे वरीष्ठ स्तरांवरून नियोजन नसल्याने सातत्याने संकेतस्थळ बंद तर कधी चालतच नाही त्यामुळे कामे होत नाही. ऑफलाईनच्या वेळी नावे चढवणे, उतरविणे अशी कामे पटकन होत होती. आता संकेतस्थळ अडचणीमुळे कामे होत नाहीत. त्यामुळे ऑफलाईन होते तेच बरे होते अशी प्रतिक्रिया काही शिधापत्रिका धारकांनी दिली आहे.
– भागवत सोनार, पुरवठा अधिकारी,वसई