वसईः समाज माध्यमांचा भडीमार , भ्रमणध्वणी-संगणकीय लेखन-वाचन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आजच्या जमान्यातही हाताने लिहिणे आणि प्रत्यक्ष हातात घेऊन वाचण्याचे महत्व कमी झालेले नाही. आजही विविध दिवाळी अंकांतून वेगवेगळ्या विषयांवर होणार्या वैचारिक मंथनास आणि दिवाळी अंकांनी एकंदर रुजवलेल्या परंपरेस मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेच दिसून येते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिका, तथा कार्व्हरकार वीणा गवाणकर यांनी यंदाच्या “लीलाई दिवाळी विशेषांका”चे प्रकाशन करतांना काढले.
नवोदित लेखक घडवणार्या, नवकवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या दिवाळी अंकांची प्रतिक्षा करणारा अस्सल साहित्यरसिक वर्ग आजही टिकून असून, ही गौरवाची बाब असल्याचेही गवाणकर यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ’आमची वसई’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पं. ऋषिकेश वैद्य, सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळे, अभिनेत्री, तथा राज्य नाट्य परिनिरीक्षण मंडळाच्या माजी सदस्या ज्योती निसळ, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे व कोमसाप, वसईचे कार्यवाह संतोष गायकवाड उपस्थित होते.
आपण हाताने केलेले लेखन विचारपूर्वक झालेले असल्यामुळे ते प्रदीर्घ स्मरणात रहाते. त्यामुळे वाचणे, लिहिणे या प्रक्रियेतून विचारशृंखाला प्रेरित होत जाते. म्हणून आज विज्ञानातून आलेल्या आधुनिक सुविधा कितीही आकर्षक वाटत असल्या तरी भाषा, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात आपल्या परंपराच शेवटी श्रेष्ठ ठरणार असल्याचे पं. ऋषिकेश वैद्य यावेळी म्हणाले. मराठी भाषा आणि साहित्य संवर्धनाचे, तसेच वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी दिवाळी अंकांचे योगदान मोठे असून, “लीलाई” सारखा वाचनीय आणि दर्जेदार साहित्य देणारा अंक सतत २४ वर्षे हा वसा चालवीत आहे, याचा अभिमान वाटत असल्याचे अभिनेत्री ज्योती निसळ यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन अनिलराज रोकडे यांनी केले.