घरपालघरमाहिती अधिकार्‍याकडून माहिती देण्यास टाळाटाळ

माहिती अधिकार्‍याकडून माहिती देण्यास टाळाटाळ

Subscribe

ह्याबाबत माहिती अधिकार्‍यास संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.

डहाणू कुणाल लाडे : तहसीलदार कार्यालय डहाणू येथे एका विषयासंदर्भात कल्पेश पटेल नामक एका व्यक्तीने माहिती अधिकार अर्ज देऊन माहिती मागितली होती. मात्र, सप्टेंबर 2020 पासून मागितलेल्या माहिती आजपर्यंत अर्जदाराला मिळालेली नाही. ह्याबाबत पहिली अपील दाखल केली असता त्याच्या सुनावणीचे पत्र मिळून सुद्धा त्यावर सुनावणी न झाल्यामुळे अर्जदाराने दुसरी अपील सादर केली आणि त्यानंतर सुनावणी होऊन तहसीलदार कार्यालयातील माहिती अधिकारी विनायक पाडवी यांना शासनाकडून अर्जदारास लवकरात लवकर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, निर्देश देऊन देखील आजतागायत अर्जदाराला माहिती प्राप्त झालेली नाही. ह्याबाबत माहिती अधिकार्‍यास संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे.

अर्जदार कल्पेश पटेल रा. राई तालुका डहाणू. यांनी 8/9/2020 रोजी तहसीलदार डहाणू कार्यालयात माहिती अधिकार अर्ज दखल केला असता, कार्यालयाकडून देण्यात आलेल्या उत्तरात “सदर विषयाबाबत या कार्यालयाच्या अभिलेख कक्षात विचारलेल्या माहिती संदर्भात शोध घेण्याचे काम सुरू असून, माहिती मिळताच आपल्यास कळवले जाईल.” असे उत्तर देण्यात आले. त्यानंतरही माहिती प्राप्त न झाल्यामुळे अर्जदाराने प्रथम अपील सादर केली. त्याचे देखील उत्तर न मिळाल्यामुळे अर्जदाराने 8/12/2020 रोजी दुसरी अपील सादर केल्यानंतर 15/12/2020 रोजी पहिल्या अपीलाबाबत सुनावणीचे पत्र अर्जदाराला मिळाले. त्यानंतर दुसर्‍या अपीलाबाबत अर्जदाराला कल्पना नसतानाच 6/5/2022 रोजी कोंकण भवन येथे सदर बाबतीत सुनावणी झाली आणि त्यांनतर दुसर्‍या दिवशी अर्जदाराला सुनावणी बाबतचे पत्र प्राप्त झाले. अर्जदाराला सुनावणीच्या दुसर्‍या दिवशी पत्र मिळाल्यामुळे त्यांना सुनावणीला हजर राहता आले नाही. सुनावणी दरम्यान तहसीलदार कार्यालयाचे जन माहिती अधिकारी विनायक पाडवी उपस्थित असल्याची माहिती विनायक पाडवी यांनी स्वतः अर्जदाराला फोनद्वारे कळवली. सुनावणी दरम्यान जन माहिती अधिकारी विनायक पाडवी यांना राज्य माहिती आयोगाकडून अर्जदारास तत्काळ माहिती पुरवण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती देखील त्यांनीच अर्जदारास दिली. त्यानंतर अर्जदाराने वारंवार जन माहिती अधिकार्‍याची भेट घेऊन त्यांच्याकडून माहिती मागितली मात्र, आजतागायत अर्जदाराला सदरची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झाली नसून, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून अर्जदाराला उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप अर्जदार कल्पेश पटेल यांनी केला आहे.
एकूणच तहसीलदार कार्यालयाकडून कोणत्यातरी कारणामुळे माहिती अर्जदाराला दिली जात नाही काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून, माहिती अधिकारात माहिती मागणार्‍या नागरिकांना योग्य न्याय मिळत नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. ह्याबाबत जन माहिती अधिकारी विनायक पाडवी यांना संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सदर प्रकरणी चौकशी करण्याची हमी आपलं महानगर सोबत बोलताना दिली आहे.

- Advertisement -

कोट –
गेल्या दोन वर्षांपासून मी मागितलेली माहिती मला दिली जात नसल्यामुळे माहिती अधिकार्‍यांच्या कार्यप्रणाली बाबत शंका उपस्थित होत आहे. दुसर्‍या अपीलची सुनावणी होऊन पाच महिने उलटून देखील अजून देखील माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तहसीलदार अभिजित देशमुख यांनी ह्या विषयी लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावावा अशी माझी मागणी आहे.
– कल्पेश पटेल, अर्जदार

कोट –
सदर प्रकरणाबाबत आपलं महानगर कडून माहिती मिळाली असून ह्याबाबत जन माहिती अधिकार्‍यांशी बोलून लवकरात लवकर माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
– अभिजित देशमुख, तहसीलदार, डहाणू
&……………………………………………………………………………………….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -