राज्यपालांना पदावरून काढून टाका,अन्यथा…

वसई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणार्‍यांची ही विकृती आहे. अशा विकृत लोकांना पक्षातून काढणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला गँगरीन झाल्यावर ज्याप्रमाणे आपण शरीराचा भाग जसा कापून टाकतो, तसे राज्यपाल आणि त्रिवेदींना फेकून दिले पाहिजे, अशी जहरी टीका शिवरायांचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. तसेच अन्यथा माझी पुढची वाटचाल काय असेल ते सांगू, असा इशाराही खासदार भोसले यांनी भाजपला दिला आहे.
नालासोपारा येथील मराठा उद्योजक लॉबीच्या पाचव्या वर्धापनदिनात खासदार उदयनराजे भोसले आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुदांशू त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधताना भाजपलाही इशारा दिला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्याचा आरोप होत आहे. राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून राज्यपालांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपने राज्याची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. राज्यपाल पद वैधानिक पद आहे. राज्यपालांना काय बोलावे कळायला पाहिजे. त्यांनी हे एकदा दोनदा केले आहे. पद झेपत नसेल कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतानाच राज्यपालांना पदावरून काढून टाका, अन्यथा पुढची वाटचाल काय असेल तर त्यावेळी सांगेन असा इशाराही त्यांनी दिली.
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी जहरी शब्दात टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलणार्‍यांची ही विकृती आहे. अशा विकृत लोकांना पक्षातून काढून टाकणे गरजेचे आहे, अशी विनंती आपण थेट पंतप्रधानांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांनी आपले सर्व आयुष्य समाजासाठी अर्पित केले. त्या माणसाबद्दल लायकी नसणार्‍यांनी शिंतोडे उडवू नये. जनतेने अशांना ठेचून काढले पाहिजे. मग कुणीही असो, असेही भोसले यांनी सांगितले.