गोवर रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आढावा बैठक

आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार शहरात ७१ प्रसविका, ११३ आशावर्कर कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी गोवर सर्वेक्षण सुरु करण्यात आलेले आहे.

भाईंदर : मुंबई, भिवंडी, ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवर रुग्ण आढळत आहेत. तर रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे मीरा -भाईंदर शहरात अशा घटना घडू नयेत तसेच गोवर आजारास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिने मीरा -भाईंदर महापालिका मुख्यालयात शहरी लसीकरण टास्क फोर्स व गोवर आजाराची सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत आयुक्त दिलीप ढोले यांनी विशेष बैठक घेतली. या बैठकीत नियमित लसीकरणाबरोबर प्रामुख्याने गोवर लसीकरण आणि गोवर आजाराचा आढावा घेण्यात आला. मीरा- भाईंदर शहरात घरोघरी सर्वेक्षण करुन गोवर लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोससाठी पात्र मात्र लसीकरण न झालेल्या ५ वर्षापर्यंतच्या सर्व लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार पहिल्या डोससाठी पात्र ७९० लाभार्थ्यांपैकी ७८१ तर दुसर्‍या डोससाठी पात्र ११५५ लाभार्थ्यांपैकी १०८९ लाभार्थ्यांना गोवरची लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या दिवशी मूल घरी उपस्थित नसणे, मूल आजारी असणे, इ. अशा कारणांमुळे लसीकरण न झालेल्या उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच लस देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्रनिहाय संशयित व निश्चित निदान झालेल्या गोवर रुग्णांचा आढावा घेण्यात आला. आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार शहरात ७१ प्रसविका, ११३ आशावर्कर कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी गोवर सर्वेक्षण सुरु करण्यात आलेले आहे. तसेच शहरातील सर्व अंंगणवाडी सेविका व मदतनीस यांनाही संशयित गोवर रुग्ण तसेच गोवर लसीकरणापासून वंचित मुले शोधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.