वसईः नालासोपारा पूर्वेकडील रियाज अली मुन्सी राजा (५५) यांना मारहाण करून नाल्यात ढकलल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा तीनच्या पथकाने केलेल्या तपासात उजेडात आल्याने रियाज हत्याकांडातील गुंता सुटला आहे. आता पोलिसांनी फक्त एकाच आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. धानीव बाग येथे राहणाऱ्या रियाज राजा यांचा अपघाती मृत्यू झाल्याची तक्रार त्यांची पत्नी मन्सुरा हिने दिली होती. तपासात मन्सुरा आणि गणेश पंडित यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्याची हत्या करून अपघाती मृत्यू बनाव केल्याची तक्रार रियाजची बहिण नुरजहा खान हिने दिल्यानंतर पेल्हार पोलिसांनी मन्सुरा, गणेश पंडित यांच्यासह इतर आठ जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होताय. गुन्हे शाखा तीनच्या पथकाने गुन्हयाचा तपास करताना काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी करत माहिती मिळवली.
गुन्हा घडलेले ठिकाण शोधून सीसीटीव्ही फुटेज तपासले. एक दहा वर्षांचा मुलाने पाहिलेली घटना पोलिसांना सांगितले. त्यामुळे रियाज मृत्यूचा गुंता सुटला आहे. २१ ऑगस्टला रियाज आपले सहकारी अनुज, विनित, जितेंद्र, टेलर आणि इतर काही लोकांसोबत कळंब समुद्रकिनारी फिरायला गेले होते. परतताना नाळा गावच्या हद्दीत टेम्पोत रियाजसोबत जितेंद्रचा वाद होऊन भांडण झाले. संतापलेल्या जितेंद्रने रियाजला टेम्पोतून खाली उतरवून मारहाण केली. तसेच त्याला नाल्यात ढकलून दिले. त्यावेळी नाल्यात पडलेल्या रियाजच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करून फक्त जितेंद्रविरोधातच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.