जव्हार: ऐतिहासिक संस्थान जव्हारला पर्यटनाचा ब दर्जा बहाल करण्यात आला आहे. परंतु, स्वच्छ व सुंदर शहराची शांतता ही गांजा तस्करांनी भंग केली आहे. विशेष म्हणजे या तस्करांना एक राजकीय नेता आधार देत असल्याची चर्चा शहरात जोर धरून आहे. त्यामुळे यावर कशाप्रकारे रोक आणता येईल, हा संशोधनाचा विषय असून शहरातील नागरिक याबाबत चिंता व्यक्त करीत आहेत. शहरात गांजा तस्करांनी मोठ्या प्रमाणावर उच्छाद मांडला असून, गांजा व्यापार जोरात सुरू झाला आहे. गांजा विक्री विरोधात कडक मोहीम सुरू असताना जव्हार पोलिसांना गांजा तस्करी करणारे सराईत गुन्हेगार गळाला लागले. मात्र अद्याप गांजा विक्रीला विराम मिळाला नसून, नशापान करणारे भरमसाट वाढतच आहेत. त्यामुळे जव्हार शहर गांजा खरेदी-विक्रीचे केंद्रच बनल्याचे स्पष्ट होत आहे.
गांजाची खुलेआम विक्री करून युवा पिढी बरबाद करण्याचे काम शहरात होत आहे. शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. मागील काही वर्षात झालेल्या गांजा कारवाईत खरेदी आणि विक्री करणारे हे रेकॉर्डवरील गुन्हेगारच निघाले आहेत. शहरात गांजा विक्रेते व ओढणारे सुसाटच आहेत. शहरातील काही ओसाड ठिकाणे गांजा विक्रीसाठी प्रसिद्ध असल्यासारखी स्थिती आहे. गांजा ओढणारे अनेकजण शहराच्या निर्मनुष्य ठिकाणी बसून नशेच्या आहारी जात आहेत. १० ते ५० रुपयांपर्यंत याची विक्री सर्रास होत आहे.
जव्हार शहर तसेच ग्रामीण भागात पोलीस यंत्रणा ही गांजा तस्करी करणार्यांवर नजर ठेवून आहेत. दोषींना जेरबंद करण्यासाठी गुप्त मोहीम राबविली जात आहे.यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
– संजय कुमार ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, जव्हार