घरपालघरमहामार्गावर बंद अवस्थेत पडलेल्या वाहनामुळे अपघाताचा धोका

महामार्गावर बंद अवस्थेत पडलेल्या वाहनामुळे अपघाताचा धोका

Subscribe

बंद पडलेली वाहने ही वेळीच रस्त्याच्या मधून बाजूला करणे गरजेचे आहे. परंतु अशी वाहने बाजूला करण्यासाठी महामार्गावर तातडीने कोणतीच यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

विरार: वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यामध्येच बंद पडलेली वाहने हटविण्यासाठी तातडीची यंत्रणा नसल्याने महामार्गावर बंद वाहनांना धडक लागून अपघात होण्याचा धोका कायम असून अशा प्रकारच्या अपघातात कैक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई व गुजरात या भागांना जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. भारताचा सुवर्ण चतुष्टकोन म्हणून गणल्या जाणार्‍या या मार्गावरून हलक्या जड अवजड अशा वाहनांची मोठी वर्दळ असते. काही वेळा मार्गावर विविध ठिकाणच्या भागात वाहने तांत्रिक बिघाड होऊन रस्त्याच्या मध्येच बंद पडतात. बंद पडलेली वाहने ही वेळीच रस्त्याच्या मधून बाजूला करणे गरजेचे आहे. परंतु अशी वाहने बाजूला करण्यासाठी महामार्गावर तातडीने कोणतीच यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

अनेकदा ही वाहने महामार्गावर पहिल्या किंवा मधल्या वाहिनीवर असतात. भरधाव वेगाने प्रवास करणार्‍या वाहन चालकांना ही वाहने बंद असल्याचे निदर्शनास येत नसल्याने अशा वाहनांना धडक बसून मोठ्या प्रमाणावर अपघात झाले आहेत. रस्त्याध्येच वाहन जेव्हा बंद पडते तेव्हा ते वाहन अवघ्या काही वेळात बाजूला करून मार्ग मोकळा करणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याने तासन्तास वाहने जागच्या जागीच दुरुस्त होईपर्यंत उभी असतात. कोणतेही सिग्नल व सूचक फलक ही लावले जात नाहीत. केवळ झाडाच्या फांद्या अडकविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशी वाहने ही वाहनचालकांना दिसून येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने बंद पडलेली वाहने वेळीच बाजूला करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

- Advertisement -

चौकट
मुंबई -अहमदाबाद महामार्गावर शिरसाट फाटा उड्डाण पुलावर मंगळवारी सकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावर बंद अवस्थेत असलेल्या वाहनाला मागून ट्रॅक्टरची धडक लागून हा अपघात झाला असून यात वाहन चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिघडाने बंद पडून अडकलेली वाहने तातडीने हलविण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -