घरपालघरपाणी देणार म्हणून रस्त्याचीही वाट लावणार का?

पाणी देणार म्हणून रस्त्याचीही वाट लावणार का?

Subscribe

यामुळे कसे तरी थातूरमातूर निकृष्ट पद्धतीने होत काम सुरू असल्याचा आरोप होत आहे

मोखाडा: तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्याप्रमाणावर पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने काही महिन्यांत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असे सुखदायी चित्र आहे. मात्र गावपाड्याच्या पाणीटाकीपर्यंत वैतरणा धरणाहुन जो पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी जे खोदकाम हाती घेतले आहे, तेच मुळात नियम बाह्य असून अनेक रस्त्यांना लागुनच हे खोदकाम होत असल्यामुळे पावसाळ्यात रस्ते खचून अनेक मार्गांचे नुकसान होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यालगत जुन्या मोर्‍यांमधून पाईप लाईन टाकली आहे. यामुळे भविष्यात नवीन बांधकाम करताना पाईप लाईनचे करायचे काय असा प्रश्न उद्भवणार आहे. याची कोणतीही काळजी ठेकेदाराने घेतलेली नाही. यामुळे कसे तरी थातूरमातूर निकृष्ट पद्धतीने होत काम सुरू असल्याचा आरोप होत आहे

मोखाडा नाशिक राष्ट्रीय मार्गावरही मोठ्याप्रमाणावर खोदकाम झाल्यामुळे हे रस्ते पावसाळ्यात खचून अनेक मोठी वाहने पलटी होवून अपघात होण्याची चिन्हे आहेत. तसेच गावपाड्यांना जोडणार्‍या रस्त्याची अवस्था देखील सारखीच आहे.राज्यमार्ग असो की राष्ट्रीय मार्ग या रस्त्यांच्या तब्बल १२ ते १५ मीटर लांबीवरच खोदकाम करता येवू शकते, असा नियम आहे. यामुळे खोडाळा भागातील अनेक मार्गावरील असे खोदकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने रोखले होते. तसे पत्रही संबंधित विभागाला देण्यात आले होते. असाच प्रकार आता मोखाडा नाशिक रस्त्यावरही चालू असून या रस्त्यांवरुन तर शेकडो वाहने दररोज प्रवास करीत असताना रस्त्याला लागूनच असे खोदकाम सुरू आहे. यामुळे रस्त्यांच्या साईडपट्र्‍या उद्ध्वस्त झाल्या असून पर्यायाने रस्त्यांची वाट लागली आहे. मात्र राष्ट्रीयमार्गांचे अधिकारी अजूनही झोपेत असून कसलीही आठकाठी या कामांना अद्याप होत नसल्यामुळे याचे दुष्परिणाम येत्या पावसाळ्यात नक्की दिसतील अशी स्थिती आहे.

- Advertisement -

जल जीवन मिशन योजनेंतर्गत केंद्र शासनाने 200 कोटीच्या आसपास खर्च करून मोखाडा तालुक्यात सर्वत्र नळपाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे.परंतु ईगल ईन्फ्रा ईडिया या कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून रस्त्यालगत खोदाई करून भुमिगत पाईप टाकणे सुरू केले आहे.
तालुक्यातील राज्यमार्ग, जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्गालगत लगतच जेसीबीने खोदाई करून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते उखडले आहेत. पुढील तीस वर्षाची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येत असल्याने, रस्ते रुंदीकरण करताना ही पाईपलाईन रस्त्याखाली जाणार आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरणाची कामे रखडणार असून नळपाणीपुरवठा योजना नादुरुस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता माधव मुसळे यांना विचारले असता योजनेचे काम कुठेही चुकीचे होणार नाही याची काळजी घेऊ असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -