घरपालघरशिक्षकांचे पगार पालघरमधूनच

शिक्षकांचे पगार पालघरमधूनच

Subscribe

पालघर येथील वेतन पथक कार्यालयात प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील वेतनाचे कामकाज एकत्रितपणे करण्यात येत आहे. त्यामुळे शालार्थ प्रणालीचा डीडीओ क्रमांक मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

वसईः पालघर जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आता पालघर येथील वेतन पथकाच्या कार्यालयातूनच काढण्यात येणार आहे. भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील वेतन पथक कार्यालयाला शालार्थ डीडीओ क्रमांक मिळाल्याने, शेकडो शिक्षकांची पालघरमधून ठाण्याला होणारी फरपट टळणार आहे.पालघर जिल्ह्यात वेतन पथक कार्यालयाच्या स्थापनेनंतरही जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ठाणे येथील वेतन पथकाच्या कार्यालयातून निघत होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना वेतन पथकाच्या कार्यालयातील कामासाठी ठाण्याला यावे लागत होते. पालघर येथील वेतन पथक कार्यालयात प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील वेतनाचे कामकाज एकत्रितपणे करण्यात येत आहे. त्यामुळे शालार्थ प्रणालीचा डीडीओ क्रमांक मिळण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

याप्रकरणी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून विधान परिषदेत लक्षवेधी सुचना मांडण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेतन पथक कार्यालयातून कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सूचना दिल्या होत्या. अखेर अधीक्षक, वेतन पथक, पालघर यांना शालार्थ डीडीओ क्रमांक मिळाला. त्यामुळे १५ मेपासून पालघर जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची बिले वेतन पथक कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ठाणे येथे होणारी फेरी टळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -