वसईः स्वातंत्र्याच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला किल्ले वसई मोहिम परिवारातर्फे सालाबादप्रमाणे यंदाही वसईच्या किल्ल्यात मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील विविध ४० ऐतिहासिक स्थळांवर मानवंदना दिली जाणार आहे.
२२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनमधील स्टुटगार्ड या शहरात जागतिक समाजवाद्यांची परिषद भरली होती. त्याठिकाणी भारताच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या मादाम कामा यांनी इंग्रजांचा युनियन जॅक हातात न घेता आपल्या कल्पनेने साकार केलेला स्वतंत्र असा भारताचा राष्ट्रध्वज फडकवला होता. याघटनेला यंदा ११६ वर्षे पूर्ण होत आहेत. किल्ले वसई मोहिम परिवारातर्फे गेली १६ वर्षे भारताचा राष्ट्रध्वज जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक स्थळांवर जयजयकार करत फडकवला जातो. या मोहिमेचा प्रारंभ १९ ऑगस्टला सकाळी सव्वासात वाजता वसई किल्ल्यात चिमाजी अप्पा स्मारकात पहिला राष्ट्रध्वज फडकावून केला जाणार आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिका वीणा गवाणकर आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जिल्ह्यातील ४० ऐतिहासिक स्थळांवर पहिला राष्ट्रध्वज फडकला जाणार आहे. यात १५ दुर्ग, २५ मंदिरे, समाधीस्थळे, टेहळणी बुरुज, कोट, प्राचीन बंदरे यांचा समावेश आहे. यास्थळांवर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर भटकंतीसह इतिहास मार्गदर्शन करण्यात येणार आहे. किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख श्रीदत्त राऊत मार्गदर्शन करणार आहेत.भारताचा हा पहिला राष्ट्रध्वज सध्या पुण्यातील केसरीवाड्यात ठेवण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या व विविध ऐतिहासिक चळवळींचा हा राष्ट्रध्वज साक्षीदार आहे. दरम्यान, स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रध्वजात बदल होत सध्याचा तिरंगा ध्वज बनला आहे. त्याची माहिती नव्या पिढीला मिळावी यासाठी पहिला राष्ट्रध्वज फडकवण्याची मोहिम हाती घेतली जाते. जगातील सर्व राष्ट्रांना आपले स्वतंत्र ध्वज आहेत. त्या ध्वजांना तेथील जनमानसात स्वतंत्र मान आणि आदर आहे. भारतीयांनी ध्वज ही कल्पना राबवली तेव्हा भारताचा तिरंगा काही एका दिवसात तयार झालेला नाही. त्याला एका शतकापूर्वी निर्माण झालेल्या संकल्पनाची पार्श्वभूमी आहे.
1) मादाम कामा यांनी २२ ऑगस्ट १९०७ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा आद्य राष्ट्रध्वज फडकवला.
2) ऑगस्ट १९३७ मध्ये या ध्वजाचे भारतात आगमन झाले. पुण्यात पोचल्यावर ध्वजाची मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. केसरीवाडा ते पुणे रेल्वे स्थानक या मार्गावर निघालेल्या या मिरवणूकीत स्वातंत्र्यवीर सावरकर सहभागी झाले होते. ध्वजाच्या आरेखनात स्वा. सावरकरांचे योगदान होते. हिंदू मुस्लिमांमध्ये एकोपा साधण्याच्या हेतूने सावरकरांनी ध्वजावर अनुक्रमे सूर्य आणि चंद्र या चिन्हांना स्थान दिले होते. या प्रदीर्घ वाटचालीच्या काळात चक्क ३४ ध्वज उदयास येऊन गेले आणि “तिरंगा” हा ३५ वा आहे.