घरपालघरसायदे मारुतीची वाडी धरणाची पिचिंग खचली; जल संधारण विभागाचे दुर्लक्ष

सायदे मारुतीची वाडी धरणाची पिचिंग खचली; जल संधारण विभागाचे दुर्लक्ष

Subscribe

सायदे मारुती वाडी येथील धरणाचे दुरुस्तीचे काम गेले दोन वर्षे धिम्या गतीने सुरू आहे. पंरतु अजुनही काम पूर्ण झालेले नाही. गेल्या वर्षी उशीरा काम सुरू केले आणि पाऊस पडल्यामुळे काम अपूर्ण राहिले आहे.

सायदे मारुती वाडी येथील धरणाचे दुरुस्तीचे काम गेले दोन वर्षे धिम्या गतीने सुरू आहे. पंरतु अजुनही काम पूर्ण झालेले नाही. गेल्या वर्षी उशीरा काम सुरू केले आणि पाऊस पडल्यामुळे काम अपूर्ण राहिले आहे. यावर्षी काम सुरू करणार असल्याचे सांगून जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच धरण पूर्ण रिकामे करण्यासाठी पाणी सोडून देण्यात आले.अशा परिस्थितीत धरणाच्या पिचिंगचे व इतर आवश्यक दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास अतिवृष्टीमुळे धरण फुटण्याचा व पुरहानी होण्याचा दाट संभव असून अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याला सर्वस्वी स्थानिक जल संधारण विभाग जबाबदार राहील, अशी सूचना पंचायत समितीचे सदस्य प्रदीप वाघ यांनी दिली आहे. तसेच उचित कार्यवाहीची मागणीही त्यांनी केली आहे. २००९-१० च्या दशकात सायदे-मारुतीची वाडी बंधार्‍याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यानच्या अवधीत आजपर्यंत जलसंपदा विभागाने याठिकाणी कोणतीही देखभाल दुरुस्ती न केल्याने या बंधार्‍याचा भराव खचला असून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या नाकर्तेपणाचा तीव्र निषेध परिसरातून व्यक्त होत आहे.

 

- Advertisement -

मोखाडा तालुक्यासह वाडा तालुक्याचीही तहान भागवणार्‍या सायदे मारुतीची वाडी बंधार्‍याची पिचिंग खचली आहे. त्यामुळे मागील वर्षी लघूपाटबंधारे आत्ताच्या जलसंपदा विभागाने दीड मिटर पाणी पातळीपर्यंत पाणी सोडून दिले होते. पर्यायाने ऐन पाणी टंचाईत याच पाणी साठ्यावर अवलंबून असणार्‍या गावांचे पाणी व्यवस्थापन कोलमडली होती. त्यामुळे तातडीने बंधारा पिचिंगच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. अन्यथा व्यापक जन आंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी तत्कालीन परिस्थितीत दिला होता. त्यावेळी जल संधारण विभागाने थातूरमातुर काम करून वेळ मारून नेली होती.

 

- Advertisement -

धरणाचे पाणी सोडून दिल्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या व धरण पट्ट्यात येणार्‍या वाडा तालुक्यातील गावामध्ये कृत्रिम पाणी टंचाई उद्भवली असून जनावरांना देखील पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे या भागातील काही लोकांनी आपल्या जितराबाच्या काळजी पोटी या धरणातील पाण्याचा विसर्ग केला असल्याचे लगतचे लोकांकडून समजते. परंतु या कृत्रिम पाणी टंचाईचा देखील प्रशासनाला कुठलाही फरक पडला नसल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. त्याबाबत वारंवार पत्र व्यवहार तसेच संबंधित अधिकारी यांना संपर्क करुन काम सुरू करण्या साठी विनंती करुन देखील काम सुरू झाले नाही. धरणाचे काम या वर्षी पूर्ण झाले नाही, तर धरणाखालील गावांना धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे धरणाखालील गावात पुरहानी झाली तर संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा वाघ यांनी जल संधारण विभागाला दिला आहे.

 

मोखाडा तालुक्यात गारनदीवर गारनदीच्या उगमस्थानीच मारुतीची वाडी येथे विस्तारीत धरण जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात आले आहे. या धरणाच्या पाण्यावर मोखाडा तालुक्यातील खोडाळा, जोगलवाडी, सायदा (१२ पाडे), उधळे, वाकडपाडा, कारेगाव, वाशींद, गोमघर, सुर्यमाळ, आम्ले तर वाडा तालुक्यातील ओगदा, परळी आदी गावे अवलंबून आहेत. या बंधार्‍यामुळे गारनदीला बारमाही पाणी चालू असते. ही नदी वाडा तालुक्यातून मार्गक्रमण करत असल्याने वाडा तालुक्यातील नदी काठच्या गावांना त्याचा पाणी टंचाईत मुबलक फायदा होत असतो. मात्र अतिवृष्टीमुळे बंधार्‍याचा भराव व पिचिंग खचल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने बंधार्‍याच्या परिघातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला आहे. त्यामुळे ऐन पाणी टंचाईत लगतच्या गावांना भीषण पाणीटंचाई जाणवत आहे.

अधिकारी नॉट रिचेबल

याबाबत जलसंपदा विभागाकडे मागील आठवडाभर सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु येथील कनिष्ठ अभियंता रत्नदिप वासनिक यांनी कोणताही संवाद साधण्याचे सौजन्य दाखवले नाही. तर उपअभियंता अजित कापडणीस हे कायम नॉट रिचेबल आल्याने धरणाच्या दुरुस्तीबाबतची कोणतीही वस्तुस्थिती समजू शकली नाही.

हेही वाचा –

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -