डहाणूः पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आदिवासींचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर सुरु असल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही आदिवासी समाजाच्या नागरिकाने धर्मांतर केल्यास त्याला आदिवासी म्हणून मिळणार्या सर्व योजना बंद करण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. तलासरी, डहाणू, वाडा, विक्रमगडसह पालघर जिल्ह्यातील विशेष आदिवासीबहुल भागात धर्मांतराचे पेव फुटले असल्याने हे पाऊल उचलण्यात आले असल्याचा दावा ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आला आहे. विक्रमगड तालुका हा पूर्णपणे ग्रामीण व डोंगराळ भागात असून येथील बहुतांश लोकसंख्या ही आदिवासी समाजाची आहे. विविध प्रकारचे आमिष दाखवून अलीकडे काही धर्माचे प्रसारक मोठ्या संख्येने आदिवासी समाजाच्या लोकांना आपल्या धर्मात समाविष्ट करू पहात आहेत. लोकही त्यांच्या प्रलोभनांना बळी पडून धर्मांतर करतात, ज्यामुळे आदिवासी रुढीपरंपरा, संस्कृती भ्रष्ट होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सर्रास सुरू असलेले धर्मांतर रोखण्यासाठी तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीने कायदेशीर पाऊल उचलले आहे.
सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटारा व ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ यांनी खुडेद ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करून या विषयावर ग्रामसभेत चर्चा करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने या विषयावर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील जे नागरिक धर्मांतर करतील त्यांना यापुढे कोणत्याही आदिवासी विकास योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सरपंच लहू नडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.