उघड्या विद्युत डिपीमुळे शालेय मुलांचे जीव धोक्यात

पण, त्यावर कोणतीच कारवाई न करत महावितरणने उघडी डिपी तशीच ठेऊन दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वसर्ई : नालासोपारा समेळ गावातील लिटील फ्लॉवर इंग्लिश स्कूल रस्त्यालगतच महावितरणची डीपी गेल्या अनेक दिवसांपासून उघडी असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. लिटील फ्लॉवर शाळेत जाण्यासाठीच्या एकमेव मार्गावर महावितरणची उघडी डीपी आहे. या रस्त्यावरून दिवसभरात शेकडो शाळकरी मुले आणि रहिवाशी ये-जा करीत असतात. त्यामुळे डीपीच्या संपर्कात होऊन एखाद्या विद्यार्थ्यांचा जीव जाण्याची भिती व्यक्त करत शिवसेनेच्या महिला आघाडी शहर संघटक रुचिता नाईक यांनी महावितरणकडे तक्रारी केल्या आहेत. पण, त्यावर कोणतीच कारवाई न करत महावितरणने उघडी डिपी तशीच ठेऊन दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

थकलेली वीज बिले वसुली आणि वीज कनेक्शन तोडण्यात महावितरणचे अधिकारी-व्यग्र असून त्यांना जीवघेण्या डिपीची दुरुस्ती करायला वेळ मिळत नसल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. स्थानिक रहिवाशांनी संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी केल्या. पण, कुणीही दाद देत नाही. जबाबदारी ढकलण्याचाच प्रयत्न केला जातो. या प्रकाराने नागरिक संतप्त असून प्रशासन दुर्घटनेची वाट बघत आहे काय?, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सुदैवाने अद्याप दुर्घटना घडली नसली तरी धोका कायम आहे. दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कर्मचारी व अधिकारी असतील, असा इशारा नाईक यांनी दिला आहे.