वसईतील शाळा बुधवारपासून बंद

पोलिसांनाही दंड वसुलीचे अधिकार

students

वसई विरार महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर टप्याटप्याने शाळा, महाविद्यालये सुरु केली जात आहेत. गेल्याच महिन्यात महापालिका हद्दीतील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्या होत्या. पण, गेल्या आठ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यावर राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने वसई विरार महापालिका ह्दीतील  पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बुधवारपासून पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात महापालिकेने कडक मोहिम हाती घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी क्लीन मार्शलच्या माध्यमातून मास्क न घालता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न घातलेल्यांकडून दोनशे रुपये दंड आकारला जात आहे. नागरीकांवर वचक रहावा यासाठी आता महापालिकेने पोलिसांनाही दंड वसूल करण्याचे अधिकार दिले आहेत.महापालिका हद्दीत पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांकडून दोनशे रुपये दंड आकारावा. दंडापोटी वसूल झालेल्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम पोलीस कल्याण निधी आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम महापालिकेकडे जमा करावी, असा सूचनाही आयुक्तांनी पोलिसांना दिल्या आहेत. शहरातील बार अँड रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळ यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंतच त्यांना व्यवसाय करण्याची मूभा देण्यात आली आहे.