घरपालघरसर्पदंशामुळे सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू

सर्पदंशामुळे सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Subscribe

खेळत असताना तिला दुखापत झाली असावी. तिला घरी घेऊन जा, असे सांगितल्याचा आरोप तिच्या वडिलांनी बोलताना केला आहे.

मोखाडा: तालुक्यातील सायदे ग्रामपंचायतीमधील बोरीचीवाडी येथील एका सात वर्षाच्या चिमुकलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परंतु ही घटना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. छाया सखाराम भोई (वय 7 वर्ष) ही मुलगी 16 मे संध्याकाळी 7: 30 दरम्यान अंगणासमोर चिंचेच्या झाडा लगत खेळत होती.खेळत असतानाच तिथेच तिला सर्पदंश झाला. ही घटना तिच्या वडिलांना कळतात त्यांनी तात्काळ 8: 30च्या दरम्यान तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. एका तासाभराच्या कालावधीनंतर तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तुमच्या मुलीला काही झालेले नाही. तिला सर्पदंश झालेला नाही. खेळत असताना तिला दुखापत झाली असावी. तिला घरी घेऊन जा, असे सांगितल्याचा आरोप तिच्या वडिलांनी बोलताना केला आहे.

यानंतर 9:30 वाजेच्या दरम्यान तिला तिच्या कुटुंबीयांनी घरी घेऊन नेले. परंतु घरी पोहोचताच तिला मोटर सायकलवरच लघुशंका होऊन तिची तब्येत खालावली. पुन्हा तिला तिचे कुटुंबीय खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. यावेळी उपस्थित डॉक्टरने सांगितले की, तिला तात्काळ मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करा. इथे तिच्यावर उपचार होणार नाहीत. लगेचच रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली. मोखाड्याकडे येत असताना अर्ध्या रस्त्यातच मात्र तिचा मृत्यू झाला. यामुळे माझ्या मुलीवर डॉक्टरांनी योग्य तो उपचार केला नाही .तिच्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही डॉक्टरांना सांगत होतो की तिला सर्पदंश झाला आहे. परंतु डॉक्टरांनी मनावर घेतले नाही. माझ्या मुलीच्या मृत्यूला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टरच जबाबदार आहेत. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत छायाचे वडील बाळू भोई यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी स्वप्नील वाघ याना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -