घरपालघरवसई-विरार महापालिकेवर शिवसेनेची धडक

वसई-विरार महापालिकेवर शिवसेनेची धडक

Subscribe

लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, समाजसेवक व सामान्य नागरिकांना पालिका अधिकारी जुमानत नाहीत. त्यांच्या तक्रारींवर कार्यवाही होत नसल्याने शिवसेनेने पालिकेवर धडक देण्याचा निर्णय घेतला होता.

वसई : जलवाहिनी जोडणी असूनही सामान्य नागरिकांना होत नसलेला सुनियोजित पाणीपुरवठा, पैसे भरूनही मिळत नसलेल्या जलजोडण्या, पालिकेच्या शाळा उपलब्ध नसतानाही पालिका वसूल करत असलेला शिक्षण कर, आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व ‘मॅरॅथॉन स्पर्धेेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा पालिकेने केलेला चुराडा इत्यादी व अन्य महत्त्वाच्या समस्यांविरोधात शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने मंगळवार, 13 डिसेंबर रोजी वसई-विरार महापालिकेवर धडक देण्यात आली. वसई-विरार महापालिकेची मुदत मार्च 2020 रोजी संपलेली आहे. या कालावधीपासून पालिकेवर आयुक्तांचीच प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे. मागील दोन-अडीच वर्षांत पालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आलेली आहेत. मात्र या कामांत प्रचंड अनियमितता आणि भ्रष्टाचार झालेला आहे. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, समाजसेवक व सामान्य नागरिकांना पालिका अधिकारी जुमानत नाहीत. त्यांच्या तक्रारींवर कार्यवाही होत नसल्याने शिवसेनेने पालिकेवर धडक देण्याचा निर्णय घेतला होता.

बाजार कर वसुलीच्या ठेक्यांत ठेकेदारांनी न भरलेली रक्कम वसूल करावी, ही रक्कम ते भरत नसतील तर त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात व त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाच्या प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, युनिव्हर्सल निमल वेल्फेअर या कंपनीने श्वान निर्बिजीकरण व लसीकरणात केलेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषी अधिकारी व कंपनीवर कारवाई करावी, महापालिका क्षेत्रासाठी 50 कोटींच्या वर वाहने खरेदी करण्यात आली; या अनावश्यक वाहन खरेदीत झालेल्या घोटाळ्याची त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करावी, महापालिका क्षेत्रातील करदाता कर भरत असतानासुद्धा त्यांना साधी कचरापेटी उपलब्ध होत नाही; त्यावर तत्काळ अंमलबजावणी करावी, महापालिका क्षेत्रात सुशोभीकरणाच्या नावाखाली मजूर सोसायट्यांना काम देऊन करदाता जनतेच्या पैशांची होणारी उधळपट्टी ताबडतोब थांबवावी या व इतर अनेक मागण्या या धडक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. उपरोक्त मागण्यांचे निवेदन जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, उपजिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, महिला आघाडी व माजी नगरसेविका किरण चेंदवणकर व अन्य शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना सादर केले. शिवसेनेच्या मागण्यांवर तातडीने विचारविमर्ष करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असले तरी या मागण्या तातडीने मार्गी न लागल्यास शिवसेनेची पुढील दिशा लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिला आहे.

- Advertisement -

जलवाहिनी जोडणी असूनही सामान्य नागरिकांना सुनियोजित पाणीपुरवठा होत नाही. पैसे भरूनही सामान्य नागरिकांना जलजोडण्या दिल्या जात नाहीत. मात्र विशेष लोकांना जलजोडण्या दिल्या जात आहेत. हा भ्रष्टाचार आहे. मागील दोन वर्षे आयुक्त पाणीपुरवठा सुरळीत करणार म्हणून सांगत आहेत. प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही. सामान्य नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करावा, ही आमची मागणी आहे. त्यासाठी पालिकेने प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाने हे काम लाइनअप करावे.
– पंकज देशमुख, जिल्हाप्रमुख

साध्या साध्या उपचारांसाठी नागरिकांना मुंबईला जावे लागत आहे. शिक्षण कराच्या नावे पालिकेने कोट्यवधी रुपये जमा केले आहेत. मात्र पालिकेच्या शाळा कुठे आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेला ताब्यात घेता आलेल्या नाहीत . याविरोधातच आमचा आजचा हा मोर्चा आहे.
– किरण चेंदवणकर, माजी नगरसेविका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -