Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर पालघर जंजिरे अर्नाळा किल्ल्याला शिवस्पर्श

जंजिरे अर्नाळा किल्ल्याला शिवस्पर्श

Subscribe

कारण समुद्राला मिळणाऱ्या वैतरणा नदीमुळे समुद्र आणि नदी अशी दोन्ही मार्गे होणारा व्यापार लक्षात घेता महसूल मिळवण्यासाठी मराठ्यांनी जंजिरा हा किल्ला बांधला.

वसईः अरबी समुद्राच्या लाटांचे आक्रमण आणि देह खिळखिळा करू पाहणाऱ्यादमट हवेशी दोन हात करत भक्कमपणे पाय रोवून उभ्या असलेल्या व मराठी इतिहासाचा मानबिंदू असलेल्या  जंजिरे अर्नाळा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशाद्वारावर पर्यटकांना आगामी काळात स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पाहता येणार आहे. अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अर्नाळा किल्ल्यावर स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. अर्नाळा किल्ला गावचे रहिवासी असलेले मनोहर वैती यांच्या शिल्पकलेतून साकारत हा पुतळा साकारला जात आहे.व्यापारासाठी भारतात आलेल्या पोर्तुगीजांनी अरबी समुद्रात असलेल्या अर्नाळ्याजवळील बेटावर फक्त एक टेहळणी बुरुज बांधला होता. पोर्तुगीज गेल्यावर मात्र या बेटाचे व्यापारी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्व अधिक वाढले. कारण समुद्राला मिळणाऱ्या वैतरणा नदीमुळे समुद्र आणि नदी अशी दोन्ही मार्गे होणारा व्यापार लक्षात घेता महसूल मिळवण्यासाठी मराठ्यांनी जंजिरा हा किल्ला बांधला.

किल्ल्याच्या उत्तराभिमुख असलेल्या प्रमुख प्रवेशद्वारावर बाजीराव अमात्य यांच्या आज्ञेवरून या किल्ल्याचे बांधकाम केल्याचा स्पष्ट उल्लेख असणारा शिलालेख आजही आढळतो. याशिवाय प्रवेशद्वारावर शरभ अथवा व्याल अशा अनेक प्राण्यांच्या रूप वैशिष्ट्यांपासून बनलेल्या प्राण्याचे तसेच विजयमाला धारण केलेल्या गजांचे सुस्थितीतील शिल्प आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर गोल घुमट आढळतो. बुरुजाखाली सैनिकांना विश्रांती घेण्यासाठी कक्ष आहेत. किल्ल्याच्या संरक्षणासाठी बुरुजांवर केलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना बघण्यासारखी आहे. किल्ल्याच्या विविध दिशांना असलेले नऊ  बुरूज परिसराचे चौफेर दर्शन घडवतात. किल्ल्याबाहेर मराठ्यांनी बनवलेली मराठी धाटणीची एक तोफ अजूनही आहे.

- Advertisement -

कालिकामातेच्या मंदिरासोबतच किल्ल्यात शंकराचे आणि दत्ताचे मंदिर असून एक दर्गादेखील आहे. अखेरच्या दीडशे सैनिकांसह उपाशीपोटी किल्ला लढवत ठेवणाऱ्या एकनिष्ठ बेलोसे यांची वीरगळदेखील या ठिकाणी येणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. किल्ल्यापासून अंदाजे पाऊण तासावर पोर्तुगीजांनी बांधलेला बुरूज आहे. तिथे मूळ अर्नाळा किल्ल्यावरची वेताळ मूर्ती स्थलांतरित केलेली आहे. किल्ल्यात पिण्याच्या पाणी साठवण्याची व्यवस्था आणि गोड पाण्यांच्या विहिरीसुद्धा आहेत.ऐतिहासिक वारसा जपणारा जंजिरे अर्नाळा किल्ला इतिहास प्रसिद्ध भक्कम जलदुर्ग म्हणून गणला जातो.या ऐतिहासिक ठेव्यामुळे या किल्ल्याचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व आहे. हेच महत्त्व लक्षात घेऊन १९०९ साली हा किल्ला भारतीय पुरातत्त्व खात्याने संरक्षित स्थान म्हणून घोषित केले आहे. दरम्यान अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अर्नाळा किल्ल्यावर स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साकारणाऱ्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यामुळे या किल्ल्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -