डहाणू तालुक्यातील प्राथमिक उपचार केंद्रात औषधांचा तुटवडा ?

काही आरोग्य उपकेंद्रांमध्ये साधे खोकल्याचे औषध ही उपलब्ध नसल्याचे विदारक दृश्य आहे. 

डहाणू तालुक्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये उपचारासाठी आवश्यक गोळ्या-औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडून आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने आजारी गोरगरीब रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. काही आरोग्य उपकेंद्रांमध्ये साधे खोकल्याचे औषध ही उपलब्ध नसल्याचे विदारक दृश्य आहे.

डहाणू तालुक्यामध्ये नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र असून एकूण 65 आरोग्य उपकेंद्र आहेत. यातील अनेक उपकेंद्रांमध्ये औषधे उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागात कानाकोपऱ्यात वसलेल्या गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा विचार करून आरोग्य सुविधा त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी प्राथमिक उपचार केंद्राच्या खालोखाल आरोग्य उपकेंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु उपकेंद्रांमध्ये गोळ्या-औषध उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा घेत येन नाही. प्रसंगी रुग्णांना खासगी दवाखाने गाठावे लागत आहेत. त्यामुळे आरोग्य उपकेंद्रांमध्ये गोळ्या-औषधे पुरावण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु ह्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असून शासनाचा हेतू साध्य होताना दिसत नाही.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसंगी पुन्हा ताळेबंदीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या सुचनांमध्ये कोरोना संबंधी कठोर नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जर नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा ताळेबंदी करावी लागेल अशी अशी घोषणा केली आहे.कोरोना विषयी आरोग्य विभागाने दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले असतानाही शासनाच्या आदेशकडे आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्न आहे.

गावात उपकेंद्र असल्यामुळे लोक किरकोळ आजारांसाठी प्रथमतः उपकेंद्रांना प्राधान्य देतात. परंतु, उपकेंद्रांमध्ये औषध उपलब्ध नसल्यामुळे लोकांना गावाबाहेरच्या खाजगी दवाखान्यात गाडीभाडे खर्च करून जावे लागते आहे. खासगी दवाखान्यात  किरकोळ आजारासाठी देखील 300 ते 400 रु खर्च करावे लागतात. तसेच कामाचा दिवसही वाया घालवावा लागतो आहे. डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने लक्ष घालून उपकेंद्रांमध्ये औषधे उपलब्ध करावीत.
– संदेश वागलोडा, ग्रामस्थ निंबापूर

गरजेची औषधे आमच्याकडे उपलब्ध आहेत. परंतु, कफ सिरप, पॅरासिटामॉल, सर्दीची औषधे जास्त प्रमाणात लागतात.
तेवढे वरच्या स्तरावरून येत नाही. त्यामुळे आम्ही उपकेंद्रांना येणाऱ्या फंडातून औषधे घेण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच ग्रामपंचायतीकडून मागणी करण्यास सांगितले आहे.
– डॉ.गाडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी