श्रद्धा वालकरच्या वडिलांनी घेतली नवीन पोलीस आयुक्तांची भेट

श्रद्धाला न्याय मिळवून देणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

भाईंदर : देशभर गाजलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी श्रद्धाचे वडील विकास वालकर आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी सकाळी मीरा-भाईंदर व वसई विरार शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेतली. जवळपास एक ते दीड तास पोलीस आयुक्त पांडे यांच्या सोबत चर्चा सुरु होती. वालकर प्रकरणात दिल्ली पोलिसांना देखील भेटणार असून श्रद्धाला न्याय मिळवून देणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाच्या तपासाला मोठा वेग आला आहे. मीरा-भाईंदर व वसई विरार शहराचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेत त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली असून आता डीएनए रिपोर्ट देखील मॅच झाला असल्याने त्याला मोठा पुरावा मानला जात असल्याने कारवाई करण्यास खूप मदत होणार असल्याचे वालकर यांनी सांगितले. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिले असल्याचे वालकर यांनी सांगितले आहे.