मोखाडा: भागातील गरोदर माता, सर्पदंश, विषप्राशन यांसह इतर ही आजाराने पिडीत नागरिकांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी १०८ क्रमांकावर फोन केल्यास तात्काळ उपलब्ध होणारी १०८ या रुग्णवाहिकेची सेवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी संजीवनी ठरत होती.परंतु गेल्या काही वर्षांपासून १०८ रुग्णवाहिकेच्या वाहनांची वेळीच देखभाल दुरुस्ती होत नसल्याने मोखाडा व जव्हार तालुक्यातील १०८ क्रमांक असलेल्या रुग्णवाहिका दुरुस्ती अभावी मृत्यूशयेवर पडल्या आहेत. तर काही रुग्णवाहिका कासवगतीने सुरू असून रस्त्यात कधीही बंद पडू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
२०१४ साली बीव्हीजी या भारत विकास ग्रुपकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत १०८ क्रमांकाची अत्याधुनिक रुग्णवाहिका पिडीत रुग्णांच्या सेवेत दाखल करण्यात आली. सोबतच रुग्णवाहिकेतून रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाताना वाटेत रुग्ण उपचाराअभावी दगावू नये यासाठी प्रत्येक रुग्णवाहिकेमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी यांची सुध्दा नेमणूक करण्यात आली. त्यामुळे या रुग्णवाहिकेतून जव्हार, मोखाडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील हजारो रुग्णांचे प्राण वाचले असून अनेक गरोदर मातांना आरोग्य केंद्रात वेळेवर पोहचवून सुखरुप बाळंतपण करण्यास मदत झाली आहे.परंतु गेल्या काही वर्षांपासून रुग्णवाहिकाच्या देखभाल दुरुस्तीकडे भारत विकास ग्रुप ( बीव्हीजी ) प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र साखरशेत व प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथील रुग्णवाहिका दीड दोन महिन्यांपासून दुरुस्ती अभावी बंद पडल्या आहेत. तर अनेक रुग्णवाहिकांचे टायर खराब झालेले असून रस्त्यात कधीही बंद पडू शकतात.
जिल्ह्यासाठी २९ रुग्णवाहिका
यातील पाच रुग्णवाहिकांमध्ये अत्याधुनिक सुविधा असून सर्व औषधोपचार साहित्य व व्हेंटिलेटर युक्त आहे.तर २४ रुग्णवाहिकांमध्ये फक्त औषधोपचार साहित्य आहे.या सर्व रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आहेत.परंतु यातील बर्याचशा रुग्णवाहिका दुरुस्ती अभावी मृत्यूशयेवर पडल्या असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र उपचारासाठी दवाखाने गाठताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रुग्णवाहिका दहा वर्षांच्या जुन्या झालेल्या असल्याने काही ना काही बिघाड होतो.ज्या रुग्णवाहिकांचे टायर खराब झालेले आहेत, त्या रुग्णवाहिकांना दोन -तीन दिवसात नवीन टायर दिले जातील.”
– मिलींद कांबळे, सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक