खैर तस्कर म्हणतात रूकेगा नही

गस्ती पथकातील कर्मचारी आणि राउंडच्या कर्मचार्‍यांकडून जंगलात खैर तस्करांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेऊन खैर तस्करीवर लगाम घातली जाते.

मनोर: वनविभागाच्या दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्र हद्दीत खैर तस्कर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.होळीच्या दिवशी नावझे गावच्या हद्दीतील जंगलात आठ ते दहा खैराच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.दहिसर वनपरिक्षेत्राचे गस्ती पथक आणि कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे खैर तस्करांचे फावले असून खैराची कत्तल आणि तस्करी पुन्हा सुरू झाली आहे.वरई पारगाव रस्त्यावरील नावझे गावाच्या हद्दीतील जंगलात खैराच्या आठ ते दहा झाडांची कत्तल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.होळीच्या दिवशी खैराच्या झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
वनविभागाच्या दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्र हद्दीतील वरई पारगाव रस्त्यावर गुंदावे,दहिसर आणि नावझे गावच्या हद्दीत रस्त्यालगत तसेच रस्त्यापासूनच्या काही अंतरावर मौल्यवान खैराच्या झाडांची संख्या मुबलक प्रमाणात आहे. खैराच्या झाडांच्या संरक्षणासाठी वनविभागाच्या गस्ती पथकाकडूम वरई पारगाव रस्त्यावर गस्त घातली जाते. तसेच वनविभागाने कर्मचारी पायी गस्त घालत असतात. गस्ती पथकातील कर्मचारी आणि राउंडच्या कर्मचार्‍यांकडून जंगलात खैर तस्करांच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेऊन खैर तस्करीवर लगाम घातली जाते.

बॉक्स

होळी सणाच्या वेळी खैराच्या झाडांची तोड करण्यात आली होती. चार ते पाच झाडे कापण्यात आली असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा झालेले ठिकाण वाटप क्षेत्र असून सातबारा उतारे घडलेले आहेत. खैराच्या झाडांची तोड करणार्‍यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचार्‍यांकडून देण्यात आली आहे. कटर मशिनचा वापर करून खैर तस्करांनी पंधरा ते वीस झाडांची कत्तल केल्याचा आरोप नावझे गावच्या ग्रामस्थांनी केला आहे.