टाळेबंदीनंतरचे समाजजीवन!

अनेक देशाप्रमाणे आपल्या देशामध्येही या याचा विचार केला गेला आणि संपुर्ण देशात टाळेबंदी लावण्यात आली.

अमोल पाटील – कवी 

कोरोना या संसर्गजन्य रोगाचा जसजसा जगभर प्रसार झाला. तसतसे सबंध जग एका नवीन रोगाचा सामना करण्यासाठी ज्याच्या त्याच्या पद्धतीने सामोरे जाऊ लागले. काही देशात या भयानक आणि नवपरिचीत रोगाचा समुळ नायनाट करण्यासाठी किंवा त्याला पसरण्यापासून रोखण्यासाठी टाळेबंदीचा पर्याय स्विकारण्यात आला. इतर अनेक देशाप्रमाणे आपल्या देशामध्येही या याचा विचार केला गेला आणि संपुर्ण देशात टाळेबंदी लावण्यात आली. आमच्या पिढीने तरी हा असा अनुभव घेण्याची पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. केंद्रशासन आणि राज्य शासन प्रशासन आरोग्य विभाग पोलीस आदी सर्व यंत्रना सर्वसामान्यांचा जीव कसा वाचवता येईल, यासाठी तयार नियमावलीप्रमाणे व टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्यरत झाले आणि या कोरोना नावाच्या आजाराविरूद्धची लढाई लढण्यासाठी देश तयार झाला. ही लढाई वाटावी तेवढी सोपी नव्हती या संबंध टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अनेक आव्हाने निर्माण झाली. विशेषतः ज्या माणसाचे हातावर पोट आहे. त्या माणसाचे जगणे सुरूवातीच्या अगदी काहीच दिवसानंतर हलाखीचे झाले. हातचे काम बंद झाल्यामुळे अर्थिक चणचण निर्माण झाली.

’सगळी सोंगे करता येतात. पण पैशाच सोंग करता येत नाही’. या सर्व परिचीत म्हणीप्रमाणे हाती दैनंदिन उदरनिर्वाहापुरताही पैसा नसल्यावर माणसाचं जगणं किती हलाखीचं होतं हे केवळ अशा परिस्थितीचा सामना केलेले अधिक जास्त परिणामकारकपणे समजू शकतात. तीच आवस्था सर्वसामान्यांची झाली आणि सामान्य माणूस हवालदिल झाला. आणि ही टाळेबंदी उठण्याची तो अतुरतेने वाट पाहू लागला. रुग्णांची होत चाललेली वाढ आणि आरोग्य सुविधेचा तुटवडा यात अनेकांची परवड झाली औषधांसाठी वैद्यकीय सोयी-सुविधांसाठी सामान्य माणूस हवालदिल झाला. प्रशासनावर, आरोग्य सुविधांवर अचानक आलेल्या ताणामुळे हे सारे घडत होते. एकेका इंजेक्शनसाठी लोकं अगदी आपल्या रुग्णांना ते मिळावे म्हणून कासाविस झाले होते. वाट्टेल तिथं धावपळ करत होते.

या संबंधकालावधीत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सर्वजण एकेक प्राण वाचवण्यासाठी अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून करत असलेली सेवा याला तोड नाही. शासन प्रशासनाच्या नियोजनाने आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नाने आणि विशेषतः प्रचंड हलाखीचे जगणं जगत. ही शासन प्रशासनाला त्यांच्या नायमावलीला समजून घेत सहकार्यकेलेल्या सुजाण नागरिकांमुळे आणि वेळेत झालेल्या लसीकरणामुळे हा आजार आटोक्यात येऊ लागला. तसा शासन प्रशासनाकडून जनतेच्या अडचणी लक्षात घेता. ही टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत गेली. दरम्यानच्या काळात नागरिक या महामारीशी लढण्यास काही अंशीतरी सज्ज झाला.

या महामारीने त्याला खूप शिकवलं अडीअडचणीत आपल्याला कामी येणारी आपली माणुसकी, माणसा माणसातील जिव्हाळ्याचे असणारं महत्व, व्यक्ती, जीवनात असणारे आरोग्याचे सर्वतोपरी महत्व, अरोग्याच्या किमान सवयी, तथा नियम हे त्याने नीट समजून, अवलोकून घेतले आणि या नवीन नियमाचा अंतर्भाव करून योग्य ती काळजी घेत तो आता सांस्कृतिक संमेलने, मेळावे, सभा, आयोजित करू लागल्याचे निदर्शनास येत आहे. कुठलेही संकट येते आणि जाते. ते येऊन गेल्याच्या नंतर त्याच्या काही वाईट आणि मनाला वेदना देणार्‍या आठवणींसह त्याने सबंध मानवी समुहाला काही धडेही देऊन जात असते. त्या धड्याला नीट समजून घेऊन त्या अनुकूल मानवी जीवन समृद्ध होत जाणे, हे सुजाण मानव समुहासाठी अभिप्रेत असते.

कोरोना या मानवी समुह जीवनावर आलेल्या संकटानेही तुम्हा-आम्हाला अनेक धडे दिले आहेत. ते नीट समजून घेऊन सार्वजनिक जीवन जगता आले. तर त्याच्याविरूद्ध आपण सक्षमपणे लढू शकतो हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे. हवालदिल झालेले शेतकरी आणि व्यापारी हळूहळू पुर्वपदावर येत आहेत. हातावर पोट असलेल्यांना परत कामं मिळायला सुरूवात झालेली आहे. शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांनी फुललेली पहायला मिळत आहेत. मैदाने, धार्मिक स्थळे, ग्रंथालये, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी लोकं उपस्थित राहू शकत आहेत. टाळेबंदीच्या काळात या सार्‍यांसाठी आसूसलेले जीव आता टाळेबंदीनंतर या सर्व गोष्टी करू शकत आहेत. एखाद्या पिंजर्‍यातील पक्षाला या मोकळ्या आकाशात मनसोक्त विहार करण्यासाठी त्या पिंजर्‍यातून मुक्त करावे तसे या जीवांचे झाले आहे की काय असे कुणाला वाटले तर त्यात नवल नाही. फक्त या सर्व बाबी करत असताना जनजीवन पुर्वपदावर येत असताना या कोरोनाच्या संकट काळात ज्या बाबी आपण शिकलो जे धडे आपण घेतले.

ज्या सवयी आपण लावून घेतल्या आणि आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी ज्या गोष्टी आपण स्विकारल्या त्याचे भान मात्र सदैव बाळगण्या याकडे सुजाण आणि जागरूक समाजजीवनाचे एक अविभाज्य भाग म्हणून पाहू शकलो आणि अंगीकारू शकलो तर निश्चितच सार्वजनिक समाजजीवनासाठी उत्तम आरोग्यासाठी समृद्ध देशासाठी ते निरंतर हितदायीच ठरेल हे निश्चित.