पोटचा मुलगाच झाला वैरी…आईची गळा दाबून हत्या

त्यानंतर देवांश रात्रभर घरात मृतदेहासोबत होता. वैशाली यांनी गुरुवारी आपली आई रेवती म्हात्रे यांना देवांशसोबत झालेल्या भांडणाची माहिती दिली होती.

वसईः दारुड्या मुलाने दारुच्या नशेत आपल्या आईची गुरुवारी रात्री गळा दाबून हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी मारेकरी मुलाला अटक केली आहे. देवांश धनू (२३) असे आरोपी मुलाचे नाव आहे.विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील गांधी चौकात असलेल्या वक्रतुंड अपार्टमेंट राहणाऱ्या वैशाली धनू यांचा दारुड्या मुलगा देवांश धनूशी गुरुवारी वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या देवांशने आपली आई वैशाली यांचा रात्री बेडरुममध्ये त्या झोपेत असतानाच गळा आवळून हत्या केली.

त्यानंतर देवांश रात्रभर घरात मृतदेहासोबत होता. वैशाली यांनी गुरुवारी आपली आई रेवती म्हात्रे यांना देवांशसोबत झालेल्या भांडणाची माहिती दिली होती. दुसऱ्या दिवशी वैशाली फोन उचलत नसल्याने रेवती म्हात्रे घरी गेल्या असता वैशाली यांचा मृतदेह घरातील बेडरुममध्ये आढळून आला. त्यांनी लगेचच पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन देवांशलाही अटक केली आहे.