Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर पालघर मोखाड्यात 'निधी आणि ऑडीट' मध्ये अडकली सोनोग्राफी; मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्याचे आव्हान

मोखाड्यात ‘निधी आणि ऑडीट’ मध्ये अडकली सोनोग्राफी; मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्याचे आव्हान

सुखकर प्रसूती करणे पर्यायाने मातामृत्यू आणि बालमृत्यूसारखे गंभीर घटना घडू नये, यासाठी गरोदर मातांची वेळोवेळी तपासणी करतानाच सोनोग्राफी अत्यंत गरजेची आहे.

Related Story

- Advertisement -

सुखकर प्रसूती करणे पर्यायाने मातामृत्यू आणि बालमृत्यूसारखे गंभीर घटना घडू नये, यासाठी गरोदर मातांची वेळोवेळी तपासणी करतानाच सोनोग्राफी अत्यंत गरजेची आहे. यासाठी आरोहण संस्थेकडून सोनोग्राफी मशीनही ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे उपलब्ध करून दिली. यानंतर ती चालवण्याची जबाबदारी पूर्णतः शासनाच्या आरोग्य विभागाची आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सोनोग्राफी करणे बंद केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जर गरोदरपणातील बाळाची स्थितीच कळली नाही तर माता आणि बाळाला कसे वाचवणार, हा खरा प्रश्न असून यासाठी शासनाने ऑडीट किंवा नियमांचे कारण न देता सोनोग्राफी पुन्हा चालू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा मातामृत्यू, बालमृत्यू सारख्या गंभीर घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होतो.

ही बाब अतिशय गंभीर असून केवळ निधीच्या कमी अधिक प्रमाणामुळे जर सोनोग्राफी बंद असेल तर हे खपवून घेणार नाही. मी याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जाब विचारणार आहे. तसेच आरोग्य मंत्र्यांनाही याबाबत कळवले आहे. खरेतर बालमृत्यू आणि मातामृत्यूसारख्या दुर्दैवी घटना आता घडू नये, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे ही सोनोग्राफी तात्काळ चालू होईल.
– सुनील भुसारा, आमदार

- Advertisement -

मोखाडा म्हटले की, आजवर मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण याबाबीच समोर येत होत्या. मात्र गेल्या काही काळापासून याची तीव्रता कमी होवून प्रमाणही कमी झाले आहे. यासाठी शासनाच्या जिल्हा परिषद आणि राज्य शासनाने आरोग्यावर दिलेले लक्ष तसेच अनेक संस्थाही यासाठी काम करत आहे. यामुळे याची तीव्रता कमी झाली आहे. मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दर गुरुवारी गरोदर माता तपासणी आणि त्याचवेळी सोनोग्राफी करणे, असा उपक्रम चालू होता. यासाठी खासगी डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक सोनोग्राफीसाठी ४०० रुपये एवढा निधी या खासगी सोनोग्राफी करणार्‍या डॉक्टरांना देण्यात येत होता. काही महिने शल्यचिकित्सकांकडून हा निधी उपलब्ध होता. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी मार्फत हा निधी देण्यात येवू लागला. यामुळे सर्व काही बरे चाललेले असताना अचानक दोन महिन्यांपासून सोनोग्राफी बंद करण्यात आली आहे.

सोनोग्राफी आमच्या रुग्णालायात आहे. मात्र याबाबतचा निधी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून उपलब्ध होत असतो. सध्या सोनोग्राफी बंद आहे. मात्र गरोदर माता तपासणी नेहमीप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात चालू आहे.
– डॉ. महेश पाटील, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय मोखाडा

- Advertisement -

सोनोग्राफी करण्यासाठी देण्यात येणारा ४०० रुपये निधी हा जास्त होत असल्याचे ऑडीटमध्ये हरकत घेतली गेल्याचे समोर आले आहे. सोनोग्राफी मशीन आपली, रुग्णालय आपले, तरीही ४०० देणे अधिकचे होत असल्याचे सांगत ऑडीटमध्ये हरकत घेण्यात आलेली आहे. सर्व यंत्रणा सोनोग्राफी सेंटरवाल्यांचीच असूनही फक्त ४०० रुपये घेत असल्याची उदाहरणे बाकी तालुक्यात असल्यामुळे या दरामध्ये कपात व्हावी किंवा कमी दर घेणारा दुसरा डॉक्टर शोधावा, असे जिल्ह्यावरुन कळवण्यात आले आहे. यावर अद्याप तोडगा न निघाल्याने सोनोग्राफी करण्याचे बंद करण्यात आले आहे. या वादात गोरगरीब आदिवासी गरोदर माता मात्र सोनोग्राफीपासून वंचित राहत आहेत. विना सोनोग्राफीचे उपचार आणि प्रसूती करणे अधिक जिकरीचे असल्याचे चित्र आहे. यावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

इतर तालुक्यात सोनोग्राफी सेंटर्समध्ये ४०० रुपयांत सोनोग्राफी करून मिळते. तो निधी शासन देते. अशावेळी सोनोग्राफी मशीन आपली, इमारत आपली तरीही ४०० रुपयेच देत असल्याचा मुद्दा ऑडीटमध्ये निघाल्यामुळे सध्या सोनोग्राफी करण्याचे थांबवण्यात आले आहे. याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. शिवाय कमी दरात सोनोग्राफी करणारे कोणी मिळेल का याचाही शोध सुरू आहे.
– डॉ संजय लोहार, तालुका आरोग्य अधिकारी

हेही वाचा –

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

- Advertisement -