घरपालघरस्थानिक मासळी विक्रेत्यांच्या संस्थांना पालिका बाजारात जागा

स्थानिक मासळी विक्रेत्यांच्या संस्थांना पालिका बाजारात जागा

Subscribe

तर यातून स्थानिक मच्छीमारांना आपली मच्छी स्थानिक बाजारात विकून चांगला भाव मिळणार आहे, त्यासोबतच स्वस्तामध्ये खवय्यांच्या तोंडाचे चोचले पुरणार आहेत.

भाईंदर :- मीरा -भाईंदर शहर हे स्थानिक आगरी, कोळी यांचे शहर आहे. या शहरातील आगरी, कोळी यांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या शहरातील मुख्य मासे बाजारात मच्छिमारांना हक्काची व कायमस्वरूपी जागा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना बाजारात जागा देण्याची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. त्याच मागणीनुसार महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी भाईंदर पश्चिमेच्या जय अंबे नगर येथील ६ होलसेल मासळी विक्रेत्यांना मच्छीमार संस्थांच्या नावाने बाजारात जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील स्थानिक मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर यातून स्थानिक मच्छीमारांना आपली मच्छी स्थानिक बाजारात विकून चांगला भाव मिळणार आहे, त्यासोबतच स्वस्तामध्ये खवय्यांच्या तोंडाचे चोचले पुरणार आहेत.

भाईंदर पश्चिमेच्या रेल्वे स्थानकालगत रस्त्यावर दररोज पहाटे होलसेल मासे बाजार भरतो. या मासे बाजारात स्वस्त दरात, चांगले व ताजे मासे मिळतात. त्यामुळे शहरातील व शहराबाहेरील नागरिक व किरकोळ मासे विक्रेते मासे घेण्यासाठी गर्दी होते. या बाजारात दररोज मासे विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. मीरा- भाईंदर महापालिकेकडून या बाजारात मासे विक्री करण्यासाठी काहींना जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु जागा देताना स्थानिक मच्छिमारांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे याचा गैरफायदा घेत ज्यांना जागा मिळाली आहे ते मासे विक्रीसाठी व मासे विकत घेण्यासाठी आलेला ग्राहक यांच्यामध्ये अडत्याचे काम करतात. ते स्थानिक मच्छिमार व ग्राहकांकडून कमिशन घेत असल्याचे स्थानिक मच्छिमार सांगत आहेत. यामुळे मच्छीमारांना कमी भाव मिळतो. त्यामुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तनमधील मच्छीमार संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन मासळी बाजारामध्ये मच्छीमार संस्थेला मासळी विकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यावेळी आयुक्तांनी स्थानिक संस्थांना जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.

- Advertisement -

त्यानुसार भाईंदर (प.) येथील जय अंबे नगर येथील मासळी विक्रेत्यांसाठी ३६ ओटले महापालिकेकडून देण्यात आलेले होते. या मासळी विक्रेत्यांमधील काही विक्रेत्यांकडून ओटल्याचा वापर मासळी विक्रीसाठी न करता थर्माकॉलचे बॉक्स व इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत होता व मासळी विक्रेते रस्त्यावर बसत होते. त्यामुळे आयुक्तांनी ९ ओटले धारकांना देण्यात आलेली परवानगी रद्द करून ती जागा शहरातील मच्छिमार संस्थांच्या ६ होलसेल मासळी विक्रेत्यास देण्यासाठी मान्यता दिली आहे.ही जागा लवकरच त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे शहर अभियंता दीपक खांबीत यांनी सांगितले आहे. महापालिका आयुक्तांनी स्थानिक मासळी विक्रेत्यास बाजारात जागा उपलब्ध करून दिल्यामुळे मासळी विक्रेत्यांना अडत्यांच्या मध्यस्थीशिवाय मासे विक्री करता येणार असल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -