बसेस सुरु करा, अन्यथा आंदोलन, प्रवासी हितवर्धक संघाचा इशारा

त्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी खोडाळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी दिला आहे.

मोखाडा : अतिदुर्गम ग्रामीण भागांतून सेवा देत पालघर- वाडा- खोडाळा -त्र्यंबकेर मार्गावर धावणार्‍या ५ बससेवा या नादुरुस्त रस्त्याचे कारण देत तब्बल महिनाभरापासून पालघर व वाडा आगार व्यवस्थापनाने बंद केलेल्या आहेत.पर्यायाने ग्रामीण भागातील सामान्य जनतेला धोकादायकपणे प्रवास करून इच्छित स्थळी पोहोचावे लागते.याबाबत प्रवासी हितवर्धक संघाने वारंवार कळवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली.त्यामुळे १४ नोव्हेंबर रोजी खोडाळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी दिला आहे.

पालघर व वाडा आगाराकडून पालघर- औरंगाबाद,वाडा – शिर्डी, वाडा – अक्कलकुवा, वाडा – मोरचोंडी – ठाणे, पालघर – नंदुरबार या बससेवा ग्रामीण भागातील प्रवासी घेत खोडाळा या महत्वाच्या बाजारपेठेतून पुढे मार्गस्थ होतात.त्यामुळे परिसरातील ३० हून अधिक गाव पाड्यातील रहिवाशांना बाजारहाट करुन पुन्हा घरी परतणे सोयीचे होत होते.परंतु, आधीच अत्यल्प बससेवा असून त्यात आहे त्याही तब्बल महिनाभरापासून अनियमित काळासाठी बंद झाल्याने प्रवाशांना अक्षरशः जीवावर उदार होवून खोडाळा येथील बाजारपेठ जवळ करावी लागत आहे.पर्यायाने खोडाळा बाजार पेठेवरही त्याचा दुरगामी परिणाम झाला असून बाजार पेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.

खासगी वाहतुकीची चांदी
वाडा -खोडाळा मार्गावर मध्यावधी ठिकाणी रस्ता नादुरुस्त आहे .पर्यायी मार्ग सुरू असला तरी अधिकृतरित्या हा मार्ग वाहतुकीसाठी खुला नसल्याने तब्बल महिन्यांपासून या मार्गावरून एक ही बससेवा धावलेली नाही.त्यातच वाडा तालुक्यातील काही गावे मोखाडा तालुका व प्रामुख्याने खोडाळा बाजारपेठेला संलग्न आहेत.त्यामुळे तेथील बाजारकरुंना खोडाळ्याकडे तर खोडाळा विभागातील बाजारकरूंना वाडा येथे जाणे केवळ बससेवे अभावी दुष्कर झालेले आहे.त्यामुळे या संधीचे सोने करत या मार्गावरून धावणार्‍या खाजगी वाहतुकीची चांदी झालेली असून ग्रामीण प्रवाशांना मात्र अक्षरशः कसरत करत प्रवास करावा लागत आहे.येत्या आठ दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित आगार व्यवस्थापनाने परस्पर समन्वय साधून बससेवा सुरळीत सुरू न केल्यास रास्तारोको आंदोलन अटळ असल्याचे सुतोवाच मुळे यांनी केले असल्याने प्रवासी संघ व या दोनही संबंधित विभागांमधील संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.