डहाणू तालुक्यात उन्हाळी भातशेती कापणीला सुरुवात

डहाणू तालुक्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडास या दोन धरणातून उजव्या व डाव्या कालाव्याने अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो.

डहाणू तालुक्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडास या दोन धरणातून उजव्या व डाव्या कालाव्याने अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. कालव्यातील पाण्यावर उन्हाळी शेती केली जाते. त्यात प्रामुख्याने भातशेती, त्यानंतर भाजीपाला व फुलझाडांची लागवड केली जाते. पावसाळी भातशेतीपेक्षा उन्हाळी भातशेती ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळी भातशेतीला पावसाळी शेतीप्रमाणे अतिवृष्टी व वादळवाऱ्यांचा त्रास नसल्यामुळे उन्हाळी भातशेती ही चांगले उत्पादन देते. सोबत भाताची पावलीही खराब होत नसल्यामुळे पावलीलाही चांगला भाव मिळतो. सध्या उन्हाळी भातशेती पिकून कापणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार भाताचे उत्पादन भरघोस निघाले आहे.

कासा, चारोटी, सारणी, उर्से, चिंचपाडा, वांगर्जे, सुर्यानगर, वाघाडी, धरमपुर व इतर भागात जिथून पाट-कालवे गेले आहेत. तिथे दुबार भातशेती केली जाते. मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी व समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आलेल्या वादळामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हतबल झाला होता. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गकोपाने हिरावून नेला होता. परंतु यंदाच्या उन्हाळी उत्पादनाने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार असल्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. भातशेती पाठोपाठ कालव्याच्या पाण्यावर अनेक ठिकाणी भाजीपाला लागवडही केली जात आहे. डहाणू तालुक्यातील शेतकरीवर्ग देखील आता भाजीपाला लागवडीकडे वळताना दिसत आहे. उन्हाळ्यात मिरची, गवार, वांगी, दुधी, मोगरा, झेंडू असे उत्पादन शेतकरी घेत आहेत.

हेही वाचा –

आता नाना पटोले अयोध्या दौरा करणार?, अयोध्येतील महंत बृजमोहन दासकडून निमंत्रण