वसईत उन्हाचा पारा चढला; पशु-पक्ष्यांवर परिणाम

वातावरणातील जागा उष्म्याने घेतल्याने वसईकर बेहाल झाले आहेत. वसई व ग्रामीण भागात उन्हाच्या तप्त झळा जाणवू लागल्या आहेत.

वातावरणातील जागा उष्म्याने घेतल्याने वसईकर बेहाल झाले आहेत. वसई व ग्रामीण भागात उन्हाच्या तप्त झळा जाणवू लागल्या आहेत. विशेषत: दुपारी घराबाहेर पडणे अवघड झाले असून वसई तालुक्यात शहरी भागासह ग्रामीण भागात देखील दुपारी बारा ते चारच्या दरम्यान रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात शुकशुकाट बघायला मिळत आहे. वसई-विरार शहरात मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात गारठा पसरला होता. या कडाक्याच्या थंडीने वसईकरांना गार केल्यानंतर आता ऋतुमान बदलून उन्हाळ्याला प्रारंभ झाला आहे. उन्हाळा ऋतू सुरू झाल्यानंतर वसईकरांना घामाच्या धारांना सामोरे जावे लागत आहे.
वसई-विरार शहराचे कमाल तापमान ३५ ते ३७ अंशावर पोहोचले असून किमान तापमान २० ते २२ अंश एवढे आहे. वाढलेल्या उष्म्याचा प्राणी व पक्षांनादेखील फटका बसू लागला आहे. अंगाची काहिली क्षमवण्यासाठी प्राणी-पक्षी पाणवठ्याच्या बाजूला घुटमळताना दिसत आहेत. तर कामासाठी रणरणरत्या उन्हात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचा कल शितपेयांकडे वाढू लागला आहे. मध्यंतरी यंदाचे हवामान पाहता पावसाळा आणि उन्हाळा असे दोनच ऋतू असल्यासारखे वातावरण दिसून आले. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान हुडहुडी भरवणारी थंडी जाणवली. दरम्यान, दिवाळीनंतर सातत्याने निर्माण होणार्यान ढगाळ हवामानामुळे थंडीचा प्रभाव कमी होत गेला. सध्या वसई तालुक्यात उन्हाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून मे महिन्याच्या सुरुवातीला वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत असल्याने मेच्या अखेरपर्यंत नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीनंतर उन्हाचा पारा चढत जाते. मात्र, यंदा त्यापूर्वीच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. शीतपेयगृह, रसवंतीगृह व शहाळे विक्रेत्यांचा व्यवसायही वाढतो आहे. चहा पिण्याची संख्या कमी होऊ लागली आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेबरोबरच अनेक प्रमुख मार्गावरून शहाळे विकेत्यांची गर्दी वाढू लागली आहे. आकारमानानुसार शहाळे दर २५ ते ६० रुपयांपर्यंत आहेत. अनेक प्रमुख मार्गांच्या दुतर्फा फिरत्या रसवंतीगृहाच्या गाड्याही वाढू लागल्या आहेत. या व्यवसायात स्थानिकांबरोबरच अनेक परप्रांतीय तरुणही सक्रिय झाले आहेत. ज्युस केंद्रांवरही गर्दी वाढू लागली आहे. फळांना मागणी वाढत असून दरातही वाढ सुरु झाली आहे. उन्हाळी मोसम विविध विक्रेत्यांना फायद्याचा ठरू लागला आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोप्यांचा वापरही वाढू लागल्याने टोपी विक्रेत्यांकडेही गर्दी वाढू लागली आहे. मात्र या उन्हाचा फटका पशुपक्ष्यांना बसत असल्याने नागरिकांनी पशुपक्ष्यांसाठी घराच्या एखाद्या कोपऱ्यात पाण्याची सुविधा करावी, असे मत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.