पालघर: डहाणू तालुक्यात इलेक्ट्रिक पोलवरून टाकलेली नेट ऑप्टिक फायबर केबल पूर्ववत ठेवण्यासाठी 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तिचा स्वीकार करणार्या एका सुपरवायझर सह खाजगी इसमाला अँटी करप्शन ब्युरो पालघर युनिट पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने सापळा रचून मंगळवारी संध्याकाळी रंगेहाथ पकडले आहे. 34 वर्षीय पुरुष तक्रारदार यांचा डहाणू तालुक्यात केबल नेट सर्विस प्रोव्हायडर म्हणून व्यवसाय आहे. ते डहाणू एमएमआरडीएच्या अख्त्यारीत सेवा देतात. इलेक्ट्रिक पोलवरून त्यांनी टाकलेली नेट ऑप्टिक फायबर केबल त्याच ठिकाणी पूर्ववत ठेवण्यासाठी अशोक कुमार सूर्यवंश राय (वय वर्ष 34 पद सुपरवायझर) याने मी एमएमआरडीएचा अधिकारी आहे, असे सांगून तक्रारदाराकडे 7 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी या अधिकार्याची लेखी तक्रार पालघरच्या लाचलुचपत कार्यालयात केली होती.
या तक्रारीची पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे आणि ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघरच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार अमित चव्हाण,पोलीस हवालदार संजय सुतार,पोलीस हवालदार दीपक सुमाडा, पोलीस हवालदार विलास भोये, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी, पोलीस शिपाई चालक जितेंद्र गवळी या पथकाने मंगळवारी 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.20 वाजता सापळा रचून पंचा समक्ष अशोक कुमार सूर्यवंश राय आणि शाहिद सलीम वारसी या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आले आहे.