डहाणू: विधानसभेच्या निवडणुकीसाठी पालघर पोलीस प्रशासन सतर्क असून शांतता आणि निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कडक पथके तैनात केली आहेत. काल तलासरीतील उधवा बॉर्डर चेक पोस्टवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंधे व त्यांच्या सहकार्यांनी नाकाबंदी दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे घेऊन जाणार्या संशयिताला अटक केली. आरोपी सुरेश वाज्या पहाड (वय ५०) रा. वडवली डोंगरीपाडा, तालुका तलासरी, हा मोटारसायकलवर खानवेलकडून येत असताना त्याला थांबवण्यात आले. तपासणी दरम्यान त्याच्याजवळून काळ्या रंगाचा लोखंडी गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २३५/२०२४ नोंदवला असून, आर्म अॅक्ट २५ (३) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३)/१३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सुरेश वाज्या पहाड याच्यावर यापूर्वी चोरी, जबरी चोरी, व शस्त्र बाळगणे यांसारख्या तब्बल २२ गुन्ह्यांची नोंद आहे. हे गुन्हे तलासरी, बोईसर, तारापूर, कासा, वाणगाव, उमरगाव, सेलवास इत्यादी पोलीस ठाण्यांत नोंदवले गेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.