महापालिकेच्या कारभाराविरोधात टाळेठोको आंदोलन

लोकशाही मार्गाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांचे पालन करीत हे आंदोलन होणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

वसईः वसई-विरार शहर महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभार सुरु असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाने महापालिकेच्या विरार येथील मुख्यालयाला रविवारी टाळेठोको आंदोलन करण्याचे जाहिर केले आहे.वसई-विरार शहरातील सर्वसामान्य जनतेचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव, अपुरे आणि अनियमित पिण्याचे पाणी, खड्डेमय रस्ते, ठिकठिकाणी असलेले कचर्‍याचे साम्राज्य. दिव्यांगांसाठीच्या अपुर्‍या सोयी-सुविधा, स्वच्छतागृह,शौचालयाची कमतरता, निकृष्ठ दर्जाची परिवहन सेवा, भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाबाबत उदासीनता, सलाइनवर असलेली आरोग्य व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापनातील बोजवारा, खेळाची मैदाने,उद्यानांची दुरावस्था, अग्नीसुरक्षेचा बोजवारा, टँकरमाफियांची दहशतीने सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाला असल्याचा आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी केला आहे.

अल्पसंख्यांक मुस्लिम बांधवांचा दफनभूमीचा प्रश्न, पाणी वाटपातील भ्रष्टाचार, मोठ्या प्रमाणात सुरु असलेली अनधिकृत बांधकामे, आरक्षित जमिनीवर होत असलेले अतिक्रमणे, चुकीच्या पद्धतीने होत असलेली कर आकारणी, आदिवासी पाड्यांची दुरावस्था, तरण तलावची दुरावस्था, फेरीवाला धोरणाबाबत उदासिनता या व इतर महत्वाच्या प्रश्नावर सातत्याने पत्रव्यवहार, निवेदने, बैठका घेऊनही प्रश्न सुटत नसल्यामुळे आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांच्या उदासिन भूमिकेविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने हे आंदोलन पुकारले असल्याचे जाधव यांनी सांगितले.
रविवार दिनांक १९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वसई-विरार महापालिकेच्या विरार येथील मुख्यालयावर टाळे ठोकून महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. लोकशाही मार्गाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांचे पालन करीत हे आंदोलन होणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.