घरपालघरतनिष्का मृत्यूप्रकरण मुंबई हायकोर्टात

तनिष्का मृत्यूप्रकरण मुंबई हायकोर्टात

Subscribe

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत अभियंत्याचा अहवाल आला नसल्याचे कारण देत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.

वसई : तनिष्का कांबळे मृत्यूप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. यात महावितरण, वसई विरार महापालिका, नगरविकास आणि उर्जाखात्याला यात प्रतिवादी करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष समिती नियुक्ती करून चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
विरारच्या बोळींजमध्ये राहणार्‍या तनिष्का कांबळे या १५ वर्षीय शाळकरी मुलीला १६ ऑगस्ट रोजी महावितरणाच्या भूमीगत वीज वाहक तारेचा धक्का लागला होता. भूमीगत वीजवाहक तारांना गळती लागली होती आणि त्यातून वीज प्रवाह पाण्यात उतरला होता. या पाण्यात पाय पडल्याने तनिष्काला वीजेचा जोरदार धक्का लागला आणि तिचा मृत्यू झाला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत अभियंत्याचा अहवाल आला नसल्याचे कारण देत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. नागरिकांच्या वाढत्या दबावामुळे पंधरा दिवसांनी अर्नाळा सागरी पोलिसांनी महावितरणाचे अधिकारी, ठेकेदार तसेच निष्काळजीपणे रस्ता खोदून केबल टाकणारे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३०४ (अ) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्ह्यात कुणाचेही नाव नसल्याने मोघम गुन्हा दाखल केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या हलगर्जीप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी मुख्यमंत्री आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण नगरविकास आणि उर्जा खात्याकडे वर्ग केले होते. मात्र, त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे महावितरण, महापालिका, नगरविकास खाते आणि उर्जाविभागाविरोधात भट यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. नागरिकांना सुरक्षितपणे सर्वत्र संचार करण्याचा संविधानिक अधिकार घटनेने दिला आहे. मात्र अशाप्रकारे नागरिकांचा जीव धोक्यात घालून या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे याचिकाकर्ते भट यांनी सांगितले. महावितरणाच्या वीजवाहक वाहिन्या निकृष्ट होत्या. त्या चुकीच्या पध्दतीने टाकण्यात आल्या होत्या. महापालिकेने रस्ता खणताना त्याची तपासणी केली नाही. त्यामुळे हे सर्व जण या मृत्यूप्रकरणी दोषी आहेत, असा भट यांचा आरोप आहे. याप्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी या जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -