बोईसर-चिल्हार मार्गावरील चेकपोस्टवर युरियाने भरलेला टेम्पो ताब्यात

बोईसर-चिल्हार मार्गावरील खैरापाडा बेटेगाव चेकपोस्ट येथे पोलिसांनी तारापूर औद्योगिक वसाहतीमधून माल घेऊन निघालेला टेम्पो थांबवून तपासणी केली. टेम्पोच्या चालकाकडे आतमध्ये असलेल्या मालासंदर्भात कोणतीच कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास बोईसर-चिल्हार मार्गावरील खैरापाडा बेटेगाव चेकपोस्ट येथे नियमित तपासणी दरम्यान पोलिसांनी तारापूर औद्योगिक वसाहतीमधून माल घेऊन निघालेला टेम्पो थांबवून तपासणी केली असता टेम्पोच्या चालकाकडे आतमध्ये असलेल्या मालासंदर्भात कोणतीच कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन बोईसर पोलीस ठाण्यात आणला. युरीयाने भरलेला हा टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर जवळपास एक ते दीड तासांनी ट्रान्सपोर्ट मालकाने टेम्पोमध्ये असलेल्या मालाचे बिल आणि इतर कागदपत्रे पोलिसांना सादर केली. या कागदपत्रांनी टेम्पोमध्ये भरलेल्या युरियाबद्दल संशय निर्माण झाला आहे. ट्रकमधील युरिया हा भिवंडी येथील कृष्णा सोल्वकेम लिमिटेड या कंपनीतून गुजरातमधील पनोली येथील हिकल लिमिटेड या कंपनीत पाठवला जात असल्याचे बिल व इतर कागदपत्रानुसार स्पष्ट होत असताना हा टेम्पो तारापूर एमआयडीसी परिसरात कोणत्या कारणासाठी आला या प्रश्नाने सर्व प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे.

संबंधित संशयास्पद युरिया वाहतुकीचा टेम्पो बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या युरियाचे नमुने सरकारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नमुन्यामध्ये जर कृषी युरिया असल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल.
– काशिनाथ तरक्षे, कृषी जिल्हा अधीक्षक, पालघर

या टेम्पोमध्ये असलेल्या एकूण ९ टन वजनाच्या संशयास्पद युरियाचे पालघर कृषी अधीक्षक कार्यालयातील तपासणी अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी येणारया अनुदानित युरिया खताचा हजारो टन साठा तारापूर एमआयडीसीमधील रासायनिक व टेक्स्टाईल कारखान्यांना काळाबाजार करून विकण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी होत असून यामध्ये एका शिवसेनेच्या बड्या नेत्यांसह मोठें रॅकेट कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अनेकदा तक्रारी होऊनसुद्धा जिल्हा कृषी कार्यालयातील अधिकारी कठोर भूमिका घेत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे यात त्यांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा –

कर्नाटकातील मराठीबहुल गावे महाराष्ट्रात सामील करा; महापौरांचे मोदींना पत्र