आराखड्यातील मंजूर रस्ता पाण्याखाली जाणार ??

त्यासाठी अजूनही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण केल्यावरच नगरपरिषदेकडून निधीची मागणी करण्यात येईल अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिली आहे.

कुणाल लाडे,डहाणू : डहाणू नगर परिषदेकडून 30 वर्ष मंजुरीविना रखडलेल्या वाढीव विकास आराखड्यातील रस्त्याच्या कामासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. चंद्रसागर खाजन ते पारनाकापर्यंत कोस्टल हाइवेचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र प्रस्तावित वाढवण बंदर झाल्यास हा रस्ता पाण्याखाली जाणार असल्याची शक्यता केंद्र सरकारच्या पर्यावरण आणि वन विभागाने नेमलेल्या एन.सी.एस.सी.एम. चेन्नई, यांनी केंद्राला दिलेल्या अहवालात नकशासह नमूद केले आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता पाण्याखाली जाणार असून त्यामुळे शासनाचा निधी वाया जाणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात येत आहे.या कामाच्या बाबतीत डहाणू येथील सोसायटी फॉर फास्ट जस्टिस या संस्थेच्या माध्यमातून एन.सी.एस.सी.एम. चेन्नई च्या अहवालाला अनुसरून नगरविकास विभागाला विचारणा करण्यात आली आहे. त्यावर नगरविकास विभागाने वाढवण बंदर कंत्राटदार कंपनी जे.एन.पी.टी. ला या विषयी पत्राद्वारे खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पत्रावर जे.एन.पी.टी. कडून अजूनही उत्तर प्राप्त नसताना डहाणू नगर परिषद कडून रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण सुरू असल्यामुळे नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.डहाणू शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याला मंजुरी देण्यात आली असली तरी त्यासाठी अजूनही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण केल्यावरच नगरपरिषदेकडून निधीची मागणी करण्यात येईल अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारकडून नेमलेल्या एन.सी.एस.सी.एम.चेन्नई यांच्या अहवालानुसार वाढवणं बंदरामुळे डहाणू शहरातील बराचसा भागात समुद्राचे पाणी शिरणार आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील बाधीत होणार्‍या भागातील कामांसाठीचा निधी वाया जाणार असल्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नगर विकास विभागाला पत्राद्वारे सूचित केले आहे. त्यांनी जे.एन.पी.टी. ला पत्र देऊन यावर खुलासा मागवला आहे. नगर विकास कडून समाधान कारक उत्तर मिळेपर्यंत या विकास कामांना स्थगिती द्यायला हवी.
– प्रकाश अभ्यंकर, सचिव, सोसायटी फोर फास्ट जस्टिस

डहाणू शहर विकास आराखड्यामध्ये मंजूर झालेल्या कामांना टप्प्याटप्प्याने सुरुवात करत आहोत. आराखड्यात मंजूर असलेला काही भाग भविष्यात पाण्याखाली येणार असल्याची शक्यता जरी वर्तवली जात असली तरी वरिष्ठ पातळीवरून तशा काही सूचना नगरपरिषदेला प्राप्त नाहीत. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागेचे अधिग्रहण सुरू असून लवकरच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
– वैभव आवारे, मुख्याधिकारी डहाणू नगरपरिषद
&……………………………………………………………………………………….