सुसरी नदीवरील पुल धोकादायक; महामार्ग प्रशासनाकडे दुरूस्तीची मागणी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानिवरी येथे मुंबई वाहिनीवरील पुलावर पूल जोडणाऱ्या सांध्याजवळ रस्त्याच्या स्लॅबला काही महिन्यापूर्वी भगदाड पडले होते.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानिवरी येथे मुंबई वाहिनीवरील पुलावर पूल जोडणाऱ्या सांध्याजवळ रस्त्याच्या स्लॅबला काही महिन्यापूर्वी भगदाड पडले होते. धानिवरी येथील सुसरी नदीवरील हा पूल महामार्ग विस्तारीकरणाच्या आधीपासून असल्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे असताना हा भगदाड सदृश्य खड्डा बुजवण्यासाठी महामार्गावरील ठेकेदार कंपनीने अभियांत्रिकी पद्धत न वापरता साध्या पद्धतीने खड्डा भरून ठिगळ लावण्याचे काम केल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे पुलाला हादरे बसत असतात. अशात पुलावरील खड्डा हा पूल जोडणाऱ्या सांध्याजवळ असल्यामुळे भविष्यात सांधा खराब होण्याची शक्यता आहे. असे असताना महामार्ग प्रशासनाने लक्ष देऊन वेळीच या पुलावरील खड्डा भरावा, तसेच अपघाताचा धोका टाळावा, असे वाहनचालक म्हणत आहेत.

सुसरी नदीवरील हा पूल जीर्ण झाला असून महामार्ग प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती केली पाहिजे. आम्ही आमच्या पद्धतीने महामार्गावरील अनेक कमतरता दाखवून देत आहोत. अपघात कमी होण्यासाठी अनेक उपाययोजनेची गरज आहे. या पुलाच्या खालील बाजूला गंज चढून काही भाग धोकादायक झाला आहे.
– हरबन्स सिंग नन्नाडे, अध्यक्ष, जिल्हा वाहनचालक संघटना, पालघर

महामार्ग विस्तारीकरणाच्या आधीपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या जीर्ण पुलाची अभियांत्रिक तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची गरज आहे. अन्यथा महामार्गावरील वर्सोवा (घोडबंदर) येथील पुलासारखी या पुलाची अवस्था होऊन मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पुलाच्या खालील भाग नादुरुस्त झाला असून तो दुरुस्त केला पाहिजे.

हेही वाचा –

राणा दाम्पत्याला मिडीयाला बाईट देणं पडणार महाग, जामीन होणार रद्द