दिलासा! मोटार अपघातात मृत्यमुखी पडणार्‍यांच्या संख्येत घट

मिरा भाईंदर शहरात काही बेशिस्त वाहनचालकांमुळे मोटार अपघात होऊन त्यात मृत्यमुखी पडणार्‍यांची संख्या जास्त होती. २०२० साली मोटार अपघाताची एकूण संख्या १७५ इतकी होती.

accident

मिरा भाईंदर शहरात काही बेशिस्त वाहनचालकांमुळे मोटार अपघात होऊन त्यात मृत्यमुखी पडणार्‍यांची संख्या जास्त होती. २०२० साली मोटार अपघाताची एकूण संख्या १७५ इतकी होती. तर त्यात मृत्यमुखी पडणार्‍यांची संख्या ४१ होती. मात्र मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय सुरु होताच या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी २०२० साली एकूण अपघात व अपघातात मृत्यमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी बघताच त्यात घट झाली पाहिजे, असे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांना सांगितले होते. भामे यांनी त्यानुसार अपघात कसे कमी होतील याकडे लक्ष दिले. २०२१ या पूर्ण वर्षभरात मोटार अपघाताची एकूण संख्या १२७ इतकी आहे. तर त्यात मरण पावणार्‍याची संख्या २७ आहे. २०२०-२१ काळात अपघातातील तुलनात्मक फरक पाहता यावर्षी ३४ टक्क्यांनी घट झालेली आहे.

वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शहरात अपघात होणार्‍या मुख्य ठिकाणांची पाहणी केली. त्यात सगणाई मंदिर नाका, वेस्टर्न हॉटेल नाका, फाऊंटन नाका, काशिमीरा नाका अशा सर्व ठिकाणी अपघात जास्त होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरता सिग्नल तोडणार्‍यांवर, वाहन अधिक वेगाने चलवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली गेली. तसेच पादचारी रस्ता ओलंडतात, त्याठिकाणी देखील अपघातांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पादचारी रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना वाहनचालकाना दिसून यावे, याकरता मोठमोठ्या लाईट्स त्या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. अपघात टाळण्यासाठी प्रत्येक महिन्याला जनजागृती मोहिम राबवण्यात येते.

नाकाबंदी करून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. यामुळे २०२१ या वर्षात मोटार अपघातांच्या संख्येत घट झाली असून मृत्यमुखी पडणार्‍यांच्या संख्येत देखील घट झाली असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. शहरातील अपघातांची संख्या आणखी कमी करण्यासाठी तसेच मृत्यमुखी पडणार्‍यांच्या संख्येत अजून जास्त घट कशी पडेल यावर वाहतूक शाखा मेहनत घेणार असून पुढच्या वर्षापर्यंत या संख्येत अजून घट झालेली दिसून येईल, अशी आशा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – 

कोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक पातळीवर कंटेन्मेंट झोनची आवश्यकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी