घरपालघरमहापालिकेच्या प्रयत्नांनी शहराची हवा बदलली

महापालिकेच्या प्रयत्नांनी शहराची हवा बदलली

Subscribe

शहरातील सर्व नागरिकांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यंदाची दिवाळी ही पर्यावरणपूरक साजरी करावी व फटाक्यांचा वापर न करता दिवे लावून साजरा करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

भाईंदर: मिरा -भाईंदर महानगरपालिकेने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे मिरा -भाईंदर शहराचा हवा दर्जा निर्देशांक 130 वरून 77 वर आला आहे. मिरा -भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर (भा.प्र.से.) यांनी महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत आवश्यक ते निर्देश दिले होते. हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्रभाग अधिकार्‍यांकडून आरएमसी प्लांटला भेट देऊन स्थळ पाहणी करून नियमांचे उल्लंघन न होण्याबाबत प्लांट धारकांना लेखी आदेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आणि आरएमसी प्लांट धारकांनी मिस्ट स्प्रे यंत्रणा बसविणे, साईट वरून बाहेर येणार्‍या गाड्यांचे टायर धुणारी यंत्रणा बसविणे, ग्रीन नेटचा वापर करणे आणि डेब्रिज वाहून नेणार्‍या गाड्या या बंदिस्त राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दैनंदिन साफसफाई करताना धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी मेकॅनिकल स्विपिंग मशीनचा वापर करणे, उघड्यावर कचरा जाळणार्‍यांवर कारवाई करणे, डंपिंग ग्राऊंडवर कचर्‍यावर प्रक्रिया करताना हवा प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता घेणे, बंदिस्त कचर्‍यातून कचर्‍याची वाहतूक करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रयत्नांमुळे मिरा- भाईंदर शहराचा हवा दर्जा निर्देशांक130 वरून 77 वर येऊन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. शहरातील सर्व नागरिकांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यंदाची दिवाळी ही पर्यावरणपूरक साजरी करावी व फटाक्यांचा वापर न करता दिवे लावून साजरा करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -