पश्चिम किनारपट्टीवरील ‘गोल्डन बेल्ट’ धोक्यात!

विरार- पालघर-वाढवण हा भाग पश्चिम समुद्रकिनारपट्टीवरील ’गोल्डन बेल्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे. ताडा, घोळ आणि शेवंड या माशांची पैदास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते.

पालघर: विरार- पालघर-वाढवण हा भाग पश्चिम समुद्रकिनारपट्टीवरील ’गोल्डन बेल्ट’ म्हणून प्रसिद्ध आहे. ताडा, घोळ आणि शेवंड या माशांची पैदास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे पालघर, वसई, डहाणूसह गुजरात येथून मोठ्या प्रमाणात बोटी या ठिकाणी मासेमारीकरता येत असतात. या किनार्‍याला लाभलेली हिरवाई आणि प्रभू श्रीराम यांचा या भूमीला झालेला पदस्पर्श यामुळेही या भागाचा लौकिक आहे. पण येथे प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदरामुळे हा ’गोल्डन बेल्ट’ धोक्यात येणार आहे. या सगळ्याचे परिणाम पर्यावरण आणि येथील मत्स्य व्यवसायावरही होणार आहेत.
या बंदर निर्मितीचे गंभीर परिणाम पालघर-शिरगाव येथील मांगेला समाजोन्नती गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव देखाव्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.वाढवण या ठिकाणी समुद्रात सुमारे वीस मीटर नैसर्गिक खोली आहे. त्यामुळे या बंदरावर मोठ्या जहाजांची हाताळणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे इथे जेएनपीटीच्या धर्तीवर मोठे बंदर उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बंदरासाठी समुद्रात भराव करण्यात येणार आहे. बॅकवॉटरसाठी बांधकाम करण्यात येणार आहे. याकरता साडेतीन हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे.

वाढवण हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील भाग आहे. येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहेत. मच्छीमारी उद्ध्वस्त होणार आहे. तसेच पाच हजार एकर समुद्रात भराव टाकला जाणार असल्याने अडणारे पाणी खाड्यांतून गावात जाऊन गावेच्या गावे समुद्रात गडप होण्याची भीती इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. गेल्या वीस वर्षांपासून वाढवण बंदराला येथील स्थानिक जनता वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून विरोध करत आहे. येथील स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांची हीच व्यथा गणेशोत्सव देखाव्यातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या विरोधात स्थानिक नागरिक आणि नेत्यांना एकत्रित येण्याचे आवाहनही मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या मंडळाचे हे ५२ वे वर्ष असून; मागील वर्षी या मंडळाने तारापूर एमआयडीसीतील प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम समोर आणले होते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष हरेश्वर निजप यांनी दिली.