भाईंदर येथे गटारावरील स्लॅब कोसळला

भाईंदर पूर्वच्या नवघर नाक्यावर असणाऱ्या हनुमान मंदिराच्या आवारातील गटारावरचा स्लॅब मंगळवारी काल रात्री ९ च्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली.

भाईंदर पूर्वच्या नवघर नाक्यावर असणाऱ्या हनुमान मंदिराच्या आवारातील गटारावरचा स्लॅब मंगळवारी काल रात्री ९ च्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेने मंदिरात येणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गटाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाजूलाच असणाऱ्या गोदावरी इमारतीची सुरक्षा भिंत देखील या घटनेत काही प्रमाणात पडल्याने नुकसान झाले आहे. घटनास्थळी मंदिराच्या आवारात उपस्थित असणाऱ्या सचिन डोंगरे यांनी लोकांना त्या ठिकाणी जाण्यासाठी मनाई करत अग्निशमन दलाला फोन करून त्वरित मदती करता बोलावल्याचे सांगण्यात येत आहे.
नवघर नाक्यावरील हनुमान मंदिर अनेक वर्षांपासून असून आजूबाजूला राहणारे वयस्कर व्यक्ती, तरुण या मंदिराच्या आवारात बसण्यासाठी येतात. लहान मुलं मंदिराच्या आवारात गटारावर खेळण्यासाठी जागा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी येत असतात. ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी घटनास्थळी लहान मुलं खेळत नसल्यामुळे कोणालाही ईजा पोहोचलेली नाही. हनुमान मंदिराच्या आवारात असणाऱ्या गटारावर १० ते १५ वर्षापूर्वी स्लॅबचे काम करण्यात आले होते.
मात्र गटाराचे स्लॅब कोसळल्यानंतर काम कोणत्या दर्जाचे करण्यात आले होते. हे सर्वांसमोर उघड झाले आहे. स्लॅब अतिशय कमकुवत असल्यामुळे पडल्याची चर्चा स्थनिक नागरिक व्यक्त करत आहेत. गटारावर लहान मुलांव्यतिरिक्त कोणीही खेळत नव्हते. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची वाहने अथवा वस्तू, वजन ठेवण्यात येत नव्हते. कोणत्याही प्रकारचे वजन ठेवण्यात येत नसून फक्त लहान मुलांच्या वजनाने गटारावरचे स्लॅब कोसळू शकते का?, पालिका स्थानिक नगरसेवक यांच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप समाजसेवक सचिन डोंगरे यांनी केला आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्यामार्फत याची पाहणी करण्यात यावी, तसेच चौकशी करून संबंधित जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी अनिल रनावडे यांनी केली आहे.