जव्हार येथील जागृत स्थान महाराष्ट्राची धाकटी जेजुरी

या यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील भक्त गण धाकटी जेजुरी - जव्हार संस्थान येथे दाखल झाले होते.

जव्हार:पालघर जिल्ह्यातील जव्हार हे शहर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. शहरात धाकटी जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा महाराजांच्या उत्सवास मार्गशीर्ष शु १ शनिवार दिनांक- ८/१२/२०१८ पासून सुरवात झाली असून आज मंगळवार २९ नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त शहरात पालखीचे आणि खंडेराव महाराजांची घोड्यावरुन भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली. तसेच रात्री महाप्रसाद भंडार्‍याचे व गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील भक्त गण धाकटी जेजुरी – जव्हार संस्थान येथे दाखल झाले होते.

जव्हार राज घराण्याचे कुलदैवत म्हणून या स्थानाला महत्व प्राप्त झाले होते. संस्थान आमदानीत जव्हार चंपाषष्टीची फार मोठी यात्रा भरत असे. या यात्रेस नाशिक,इगतपुरी,घोटी,देवळाली आदी भागांतून अनेक भाविक येत असत. ’’जेजुरी या खंडेरायाच्या मुख्यस्थानी ज्या भाविकांना दर्शनासाठी जाणे शक्य होत नसे, असे अनेक भाविक जव्हार येथील धाकटी ’’जेजुरी’’ येथे दर्शनासाठी येत असत. जव्हारचे राजे चौथे पतंगशाह यांच्या मातोश्री कै.राणी लक्ष्मीबाई या जेजुरीच्या रामजी चव्हाण यांच्या कन्या. त्यांचे माहेरचे नाव मुक्ताबाई. मुक्ताबाई यांचे उपास्य दैवत ’’खंडोबाराया’’ असल्याने या दैवताचे मंदिर जव्हार येथे सुद्धा बांधण्याचा असा आदेश त्यांनी आपला मुलगा राजे ४थे पतंगशाह यांना दिला.जेजुरी सारखेच कडेपठार असलेल्या स्थानावर बांधण्यासाठी जव्हार गावाच्या एका बाजूस पठारावर सूर्य तलावाशेजारी शांत व प्रसन्न जागा निवडून ४ थे पतंगशाह यांनी जव्हार येथील मंदिर बांधले.

जव्हार आणि देवस्थान

शिव आणि शक्तीचे प्रतिक म्हणजे श्रीखंडोबाराया ! शिवाची आणि शक्तीची भक्ती करणे हे तर खर्‍या शूरवीरांचे लक्षण. इतिहासात ज्या ज्या राजसत्ता उभ्या राहिल्या आणि संस्थाने प्रस्थापित झाली त्यामागे अधिष्ठान होते ते राजघराण्याच्या कुलदैवतेचे आणि राजगुरूंचे. जयबा राजांच्या संस्थानच्या नावातच जय आणि हर होते. जयहर अर्थात जव्हार ! जव्हार संस्थानची रणगर्जना होती हर हर महादेव ! म्हणजेच जय मल्हार ! जय मल्हार !! जव्हार राज्याचे जे चिन्ह होते. त्यात ही जय मल्हार या नावाचा उल्लेख अग्रभागी होता.