एका बेटाचे जगणं सोयीसुविधांविना

कीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून देशाचा विकास करत असताना रेल्वे मार्ग ,उत्तम दर्जाचे आणि जलद प्रवासाचे रस्ते ,गाव तिथे रस्ता असे मोठमोठे प्रकल्प प्रशासन राबवत आहे.

सफाळे :पालघर तालुक्यातील वैतरणा येथील दोन्ही नद्यांच्या मधोमध एका बेटावर असलेले गाव म्हणजे वाढीव. वाढीवमध्ये देश स्वतंत्र व्हायच्या आधीपासून नागरी वास्तव्य आहे. वाढीव गावात जाण्यासाठी चालत रेल्वे रुळाचा वापर करावा लागत असल्याने अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे जाण्या-येण्यासाठी दळणवळण नसल्याने गावातील नागरिकांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गावाची आताची लोकसंख्या २ हजार ६८ असून रस्त्याअभावी दळणवळणापासून वंचित राहावे लागले आहे. विशेष म्हणजे या गावात दोन चाकी, चार चाकी असे कुठलेही वाहन जाण्यासाठी मार्ग अजून उपलब्ध झालेला नाही. वैतरणा आणि सफाळे अशा शहरी भागापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असणार्‍या या गावातील नागरिकांना आजही रेल्वे रूळ मार्गाने पायी प्रवास करावा लागतो. आणि त्याच मार्गाच्या प्रवासाने मुलांच्या शिक्षणासोबत आपला उदरनिर्वाह देखील इथले नागरिक करत आहेत.

एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून देशाचा विकास करत असताना रेल्वे मार्ग ,उत्तम दर्जाचे आणि जलद प्रवासाचे रस्ते ,गाव तिथे रस्ता असे मोठमोठे प्रकल्प प्रशासन राबवत आहे. तर दुसरीकडे वाढीवसारखी गावे अजूनही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात योग्य प्रकारे सुख सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील नागरिक दळणवळणापासुन वंचित आहेत. राज्य व केंद्र शासनाकडे सफाळे भागातून वाढीव येथे येण्यासाठी पूल बांधून मिळावा यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतमध्ये ठराव करण्यात आले. त्याचबरोबर आंदोलन ही करण्यात आली. मात्र या समस्येकडे शासन गांभिर्याने पाहताना दिसत नसल्याने हा भाग नागरी वस्तीपासून दुर्लक्षितच राहिला आहे.

आमच्या वाढीव बेटाला अनेक वर्षापासून दळणवळणाचे साधन नसल्याने नागरिकांना रेल्वे रूळावरून चालत प्रवास करावा लागतो. अनेक अपघात रेल्वे ट्रेन खाली झाले आहेत. यासाठी शासनाने उपाययोजना करून दळणवळणाची सोय उपलब्ध करायला हवी.
– विनायक पाटील
उपसरपंच, वाढीव- सरावली