घरपालघरअवजड वाहनांचा लोड लहान वाहनचालकांच्या डोक्यावर

अवजड वाहनांचा लोड लहान वाहनचालकांच्या डोक्यावर

Subscribe

डबर,रेती,खडीसारखे गौणखनिजाची वाहतूक करताना त्यावर कोणत्याही प्रकारचे आच्छादन घातले जात नसल्याने जोरदार हवेने हे गौणखनिज रस्त्यावर सांडल्याने त्यावर घसरून अनेक लहान मोठे अपघात देखील होत आहेत.

बोईसर : बोईसर -तारापूर ते डहाणू हा दुपदरी रस्ता पालघर आणि डहाणू तालुक्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे.या रस्त्यावरून तारापूर एमआयडीसी,तारापूर अणूऊर्जा प्रकल्प,बीएआरसी सारख्या मोठ्या प्रकल्पात कामासाठी रोज हजारो कामगार दैनंदिन प्रवास करीत असतात.मात्र या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून नियमबाह्य अवजड वाहनांची रहदारी प्रचंड वाढली असून डंपर,हायवासारख्या अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक (ओव्हरलोड) गौणखनिज भरून मालाची वाहतुकीचे नियम मोडून सतत वाहतूक केली जात आहे.यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांची पायमल्ली करून भरधाव वेगाने वाहतूक केली जात असल्याने रस्त्यावरून जाणार्‍या मोटरसायकल आणि इतर लहान वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.डबर,रेती,खडीसारखे गौणखनिजाची वाहतूक करताना त्यावर कोणत्याही प्रकारचे आच्छादन घातले जात नसल्याने जोरदार हवेने हे गौणखनिज रस्त्यावर सांडल्याने त्यावर घसरून अनेक लहान मोठे अपघात देखील होत आहेत.

बोईसर -तारापूर -डहाणू या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या दुचाकीचालकांना वाहतुकीचे नियम मोडले प्रकरणी परनाळी बाणगंगा पूल,चिंचणी बायपास या ठिकाणी नियमीत तपासणी दरम्यान पोलिसांकडून दंड आकारणी केली जाते.मात्र या दरम्यान अवजड ओव्हरलोड ट्रक,ट्रेलर,कंटेनर वाहने आणि गौणखनिजाची वाहतूक करणारी डंपर आणि हायवासारखी वाहने नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करीत असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दंडात्मक कारवाई केली जात नाही.त्याचप्रमाणे गुजरात राज्यातील मालवाहतूक करणारी अवजड वाहने देखील उंबरगाव मार्गे महामार्गावरील दापचरी येथील सीमा सुरक्षा तपासणी नाका चुकवून घोलवड डहाणू या रस्त्याने तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ये जा करतात.या वाहनांवर देखील प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांचा कोणताही अंकुश नसल्याचे दिसून येते.
प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलिसांच्या या पक्षपाती कारवाईमुळे सामान्य वाहनचालकांच्या मनात मात्र राग आणि असंतोषाची भावना तयार होत असल्याची खंत अनेक दुचाकी चालकांनी बोलून दाखवली.पालघर जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या वाहतूक विभागाने या अवजड ओव्हरलोड वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

 

पालघर जिल्ह्यात वाहतूक शाखेची नवीन यंत्रणा कार्यरत झाली आहे. आमच्या विभागाकडून लवकरच वाहतुकीचे नियम मोडणार्‍या अवजड वाहनांवरती कठोर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

आसिफ बेग,
सहाय्यक पोलीस निरीक्षक
वाहतूक शाखा पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -